औरंगाबाद : दुचाकीवरून जाताना महिलेची ओढणी गाडीत अडकली, गळ्याला फास बसला ( She died by hanging on two wheeler ) आणि तिला जबर मार लागला. रुग्णालयात दाखल केले मात्र तिचा ब्रेन डेड झाला. आता आयुष्य संपणार हे पतीला कळताच अवयव दान करण्याचा निर्णय झाला. ऐन दिवाळीच्या दिवशी तिघांना जीवन दान मिळाले. जळगाव जिल्ह्यात घडलेल्या घटनेत औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात अवयव दानाची प्रक्रिया ( Organ Donation Procedure at MGM Hospital ) पार पडली. या महिलेच्या दोन किडनी आणि यकृतामुळे तीन रुग्णांना जिवनदान मिळाले आहे. या कार्यासाठी झेडटीसीसीचे अध्यक्ष आणि उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या टीमने परिश्रम घेतले.
महिलेचा झाला होता अपघात : दिवाळीची खरेदी करण्यासाठी दुचाकीने बाजारात जातांना ओढणी दुचाकीच्या चाकात गुतून जळगाव येथील एका ३८ र्षीय विवाहितेचा १६ ऑक्टोबर रोजी अपघात झाला होता. या महिलेवर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, उपचारात प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्णाच्या पतीने व कुटुंबियांनी अवयदान करण्याचे धाडस दाखवले. याच वेळी औरंगाबाद युथ सोशल वेलफअर फाउंडेशनचे राजेश सूर्यवंशी यांनी रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेत अवदानाची प्रक्रिया समजून सांगितली. त्यानंतर डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधत या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली एमजीएम रुग्णालयाची एक रुग्णवाहिका आणि काही तज्ञ डॉक्टरांचे पथक तत्काळ जळगावसाठी रवाना झाले. शनिवारी रात्री या रुग्णाला औरंगाबाद एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले.
तिघांना मिळाले जीवनदान : औरंगाबादला आल्यानंतर रुग्णांची सपूर्ण तपासणी करण्यात आली. परंतु, रविवारी रात्री उपचारा दरम्यान या महिलेचा ब्रेनडेड झाला. त्यामुळे काही तासातच डॉ. प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने परिश्रम घेत रुग्णांचे दोन्ही किडनी, यकृत काढून त्यांना जिवंत ठेवले. यातील एक किडनी एमजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ३० वर्षीय महिलेला दान करण्यात आली असून दुसरी किडनी सिग्मा रुग्णालयातील ३७ वर्षीय महिलेला देण्यात आली आहे. तसेच यकृत हे पुण्याला पाठवण्यात आले असून ते एका ४२ वर्षीय पुरुष रुग्णाला दान करण्यात येणार आहे. हि शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. मयुरी पोरे, डॉ. प्रशांत अकुलवार, डॉ. योगेश अडकुने, डॉ. जिब्रान अहमद, डॉ. वासंती केळकर यांसह पुणे येथील डॉ. निना देशमुख यांनी परिश्रम घेतले.