औरंगाबाद - कापसाचा भाव काय म्हणलं की सांगतात 370, मक्याचा भाव विचारला की म्हणतात 370; आता हे झोपेत देखील म्हणत असतील 370, त्यामुळे बायकोलाही आश्चर्य वाटत असेल, अशी खिल्ली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडवली आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बंदोबस्त करण्यासाठी महत्त्वाच्या सर्वपक्षीय नेत्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. यानंतर दहशतवाद्यांवर हल्ला करण्यासाठी ठराव करून लष्कराला अधिकार देण्यात आले. सैन्याने अभिमानास्पद कारवाई केली. मात्र, त्यानंतर सर्व ठिकाणी हल्ला केल्याचे सांगत फिरत आहेत, अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली. तसेच परवानगी आम्ही दिली, आणि हे सर्व ठिकाणी छप्पन इंचाची छाती असल्याचे सांगत आहेत, असे पवार म्हणाले. याआधी इंदिरा गांधींनी भूगोल बदलला होता. मात्र, असे कधीही केले नसल्याचे पवारांना सांगितले.
हेही वाचा आम्ही पैलवानांसोबत कुस्त्या खेळतो; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
विधानसभा निवडणुकीतील प्रत्येक प्रचारसभेत भाजपचे नेते 370 वर बोलत आसल्याने पवार यांनी त्यांच्या खास शैलीत टीका केली.
पुढे बोलताना, स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या संरक्षणासाठी कलम 370 लावण्यात आले. त्यामुळे कोणालाही तिथे शेती करता येणार नव्हती. कुठलीही जागा घेता येणार नव्हती परंतु, आता कलम काढल्याने गणित बदलेले असल्याचे पवार म्हणाले. आजही नागालँड व सिक्कीममध्ये देखील तुम्हाला शेती करता येत नाही, त्याचे काय? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री विरोधीपक्षात असताना कापसाला सात हजारांचा भाव देण्याची मागणी करत होते. आज पाच वर्षात दिला का सात हजारांचा भाव? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला. तसेच आज काहीही विचारले तरी 370हेच उत्तर येत असल्याची टीका त्यांनी केली.
हेही वाचा करून गेलं गाव अन् भलत्याचं नाव, अशी सध्याची भाजपची अवस्था - पवार
अमित शहा यांनी शरद पवार यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना, त्यांनी स्वत: मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांचा पाढा वाचला. यामध्ये रोजगार हमी कायदा, महिला आरक्षण, मंडल आयोग यांसारख्या कायद्यांची अंमलबजावणी करताना आपण मुख्यमंत्री असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच सत्ताधारी सुडाचे राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली. पंतप्रधान पदाचा आम्ही कधीच अवमान केला नसून, सत्ताधारी मात्र सतत पंडीत नेहरू व गांधी घराण्यावर टीका करून त्याच्या पदाचा अवमान करत आहेत. 150 वर्षांच्या ब्रिटीश राज्याला बाहेर काढण्याचे काम नेहरू-गांधींच्या काँग्रेसने केल्याची आठवण पवार यांनी भाजपला करून दिली.
कन्नडच्या जाहीर सभेत शरद पवार यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका केली. त्यांचे आई - वडील आमच्या सोबत काम करत होते. मात्र आज परिस्थिती वेगळी असल्याचे पवार म्हणाले.