औरंगाबाद- शहरातील कोरोनाबाधित सात वर्षाची मुलीने डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देत कोरोनावर विजय मिळवला आहे. एका खाजगी रुग्णालयात मुलीवर उपचार सुरू होते. ती बरी झाली असून तिला घरी सोडण्यात आले आहे. या चिमुकलीच्या आजीला संसर्ग झाल्याने त्यांच्यावर देखील उपचार करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना देखील उपचारानंतर सोडण्यात आले होते.
सिडको भागात राहणाऱ्या 58 वर्षीय महिलेला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले होते. या तपासणीत सात वर्षीय चिमुकलीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्याने तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
58 वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने 3 एप्रिल रोजी या मुलीसह तिच्या आई, वडील तसेच मोठ्या बहिणीची देखील स्वॅब तपासणी करण्यात आली होती. यात सात वर्षीय मुलीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे कुटुंबामध्ये दोघांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली होती.
उपचारानंतर 58 वर्षीय महिलेचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातून त्यांना सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या नातीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आजीनंतर आता नात देखील बरी होऊन घरी गेली. औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित 3 रुग्ण बरे झाले आहेत. तर, तिघांचा मृत्यू झाला असून 23 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.