औरंगाबाद- हार्डवेअर दुकानाचे शटर उचकटून सुमारे ३० हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या भंगार विक्रेत्याला पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या सहा तासात गजाआड केले. शेख इरफान शेख लाल (२५, रा. गारखेडा गाव) असे आरोपीचे नाव आहे.
इरफानने त्याचा साथीदार शेख बबलू शेख रऊफ (रा. गारखेडा गाव) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनशाम सोनवणे यांनी सांगितले. गारखेडा परिसरात महेश रामेश्वर तोतला (रा. न्यू एसटी कॉलनी, सिडको, एन-२) यांचे धरतीधन प्लाझा इमारतीमध्ये पुष्पक सॅनिटेशन अँड पेंट्स या नावाचे हार्डवेअर दुकान व गोडाऊन आहे. १५ ऑक्टोबरला मध्यरात्री तोतला यांच्या दुकानाच्या गोडाऊनचे शटर उचकटून चोरट्यांनी १३ हजाराचा गिझर व मिक्सर चोरी करत सीसीटीव्ही कॅमेरे फोडले होते. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, ही चोरी इरफान शेखने केल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी त्याला बीजीएम गार्डन, एन-३, सिडको येथे पकडले. यावेळी त्याने साथीदार शेख बबलू याच्या मदतीने दुकानात चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या भंगाराच्या दुकानातून गिझर व मिक्सर जप्त केले आहे. ही कारवाई उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकनगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनशाम सोनवणे, सहाय्यक फौजदार बी.डी. राठोड, जमादार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड आदींनी केली.
हेही वाचा- औरंगाबादेत गावठी पिस्तुलसह अट्टल गुन्हेगाराला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई