औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी उमेदवारी न मिळाल्याने आपण नाराज असल्याचे जाहीर केले होते. मात्र, नाराज असलो तरी अपक्ष निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिका सतीश चव्हाण यांनी रविवारी स्पष्ट केली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघ लढवण्याची मागणी राष्ट्रवादीने केली होती. मात्र, काँग्रेसने जागा वाटपाचा निर्णय जाहीर न करता सुभाष झांबड यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादीला उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षा मावळल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याचा राष्ट्रवादीने दावा केला होता. मागील ४ लोकसभा निवडणुकीत औरंगाबादेमधून काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे राष्ट्रवादीने औरंगाबाद लोकसभेची जागा देण्याची मागणी केली होती. मात्र, काँग्रेसने मागणी फेटाळत औरंगाबाद मतदारसंघासाठी सुभाष झांबड यांच्या नावाची घोषणा केली. या उमेदवारीवर नाराज असल्याचे सतिष चव्हाण यांनी सांगत, नाराज असलो तरी आघाडीचा धर्म पाळू असे सांगितले आहे. यामुळे झांबड यांच्यासमोरची अडचण दुर झाली आहे. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म येत नाही. तोपर्यंत निवडणूक लढवणार नसल्याचे आमदार सतिष चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.