औरंगाबाद - नवा पक्ष निर्माण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी औरंगाबादेत दिली. 5 फेब्रुवारी पासून महाराष्ट्राचा दौरा सुरू करत असून पाहिले अधिवेशन एप्रिलमध्ये मुंबईत घेतले जाणार आहे. पक्षाचा झेंडा आणि नाव जनतेतून आलं पाहिजे. म्हणून लोकांनी नाव आणि झेंडा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुचवावे, असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
राजकारणापासून अलिप्त असलेले व सज्जन लोक पक्षात सामावून घेऊ. हा पक्ष सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी काम करेल. फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी वंचित राहिला. आताचे असो किंवा आधीच सरकार असो शेतकरी कर्जमाफी देताना निकष न लावता कर्जमाफी दिली गेली पाहिजे होती, असे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले आहे.
निवडणुकीच्या काळात जे आश्वासन उमेदवार देतात ती शपथपत्र म्हणून घेतली पाहिजे, निवडून आल्यावर त्यांनी दिलेले आश्वासन 3 महिन्यात पाळले नाही, तर त्यांच पद काढून घेण्यात यावे, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घ्यावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. रयत क्रांती संघटनेचा निर्धार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात संघटनेची नव्याने उभारणी आणि त्याची वाटचाल याबाबत मंथन करण्यात आले.
आज शरद जोशी यांची शेतकरी संघटना सोडली तर शेतकऱ्यांसाठी झटणारे सर्व सत्ताधाऱ्यांसोबत गेले असल्याने रस्त्यावर उतरणारे आपण एकटेच आहोत. आज आपल्यासोबत काम करणारा वर्ग शेतकरी आहे. दिवसभर काम केल्यावर आता रात्री आपल्या संघटनेसाठी काम करा. झेंडा आपला घ्या आणि त्याची काठी मात्र शेतकऱ्यांची घ्या आणि आपला प्रचार आणि प्रसार करा, अस आवाहन खोत यांनी पदाधिकाऱ्यांना केले.