औरंगाबाद - राज्यात एकत्र आहोत आता 'मिशन 2024' पुढे ठेऊन लोकसभेतही एकत्र लढलो तर पंतप्रधानपदी एक मराठी माणूस म्हणून, पवार साहेब बसल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात केले आहे.
हेही वाचा - '...म्हणून मला कोणी 'डिग्री' विचारत नाही'
रोहित पवार म्हणाले, की "साहेबांचा लोकांवर विश्वास आहे. लोकांचा साहेबांवर विश्वास आहे. तो विश्वास आहे म्हणून ते साहेब आहेत. विश्वास असला तर हातात बूट घेऊन उभं राहण्याची वेळ आली नसती." असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. भाजपच्या काही लोकांना अजूनही सत्तेत येणार असल्याची आशा आहे. त्यामुळे काही ठिकाणी शिवसेनेसोबत जाण्याचे विधान करत आहेत. मात्र, पुढील साठ वर्ष त्यांना आशेवरच राहावे लागणार असून, पुढील पाच वर्षात हेच सरकार परत येईल असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी प्रवक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप साळुंके यांच्या सत्कार कार्यक्रमासाठी रोहित पवार औरंगाबादेत आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार साहेब हे लोकांच्या मनात असलेले पंतप्रधान असल्याने आपण फक्त ती भावना बोलून दाखवल्याच सांगितले. साहेब अजून तरुण आहेत त्यामुळे 2024 मध्ये राज्यात एकत्र आलो तर देशात एकत्र आलो तर मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला. त्याच बरोबर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या वक्तशीरपणाचे कौतुक करत राज्यात सर्वत्र वेळेवर कार्यक्रम घेण्याची सवय लावली पाहिजे. असा टोला त्यांनी सर्वच राजकीय कार्यकर्त्यांना लगावला.
भाजप नेते असतील किंवा मुनगंटीवार असतील त्यांनी अनेकवेळा शिवसेना सोबत येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांना आशेवरच राहू द्या. सरकार फोडण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही असेही त्यांनी भाजप नेत्यांना सुनावले. राज्यात महिलांवर होणाऱ्या घटना चुकीच्या आहेत. आपला उत्तर प्रदेश होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आम्ही राज्यात तसे कडक कायदे लागू करण्याची मागणी विधानसभेत करू, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड :'माझ्या मुलीला होणाऱ्या वेदना आरोपीला द्या'