औरंगाबाद - पैठण तालुक्यातील वाघाडी येथे सशस्त्र दरोडा पडला असून या दरोडेखोरांनी शेतकऱ्यांना मारहाण केली आहे. यामध्ये ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पैठण तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
शेतकरी पाऊस पडावा, यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहे. तर दुसरीकडे महागाईने होरपळत असलेल्या जनतेला आता दरोडेखोरांनी जेरीस आणले आहे. शहरापासून अवघ्या ६ कि.मी. अंतरावर असलेल्या वाघाडी शिवारातील एका घरावर अज्ञात ४ दरोडेखोरांनी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास धारधार शस्त्राने हल्ला करुन ३ जणांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह एकूण ९० हजार ७०० रुपयांचा ऐवज पळवला. या घटनेमुळे पैठण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
हल्ल्यातील जखमींना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पैठण तालुक्यातील वाघाडी येथे दरोडा पडल्याची माहिती पैठण पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांना मिळताच त्यांनी तातडीने पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. दरोडा टाकताना दरोडेखोर मुद्देमाल घेऊन पळून गेले. मात्र, दरोडा टाकण्यासाठी आणलेले धारदार सशस्त्र कोयता, लाकडी दांडे, दोरी व इतर साहित्य घटनास्थळी पोलिसांना सापडले. पोलिसांनी ते सर्व जप्त केले. या घटनेचे गांभीर्य ओळखून पैठण पोलिसांनी औरंगाबाद येथील श्वान पथकास पाचारण केले. मात्र, श्वान डॉग स्विटी हा काही अंतरावर गेल्यानंतर थांबले. त्यामुळे दरोडेखोर हे वाहनातून आले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची तक्रार सोनल शिवलाल गलवाड (रा.नाथ फॉर्म वाघाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख करत आहेत.