औरंगाबाद - रिक्षाचालकाला सोबत घेऊन भाचीच्या मदतीने सहप्रवासी महिलांच्या पर्समधील दागिने आणि रोकड लांबविणारी टोळीला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे मावशी व भाची हे धुळे, चाळीसगावहून शहरात येऊन चोरी करायच्या. त्यानंतर आपसात वाटाघाटी करुन पुन्हा मुळगावी निघून जात होत्या. त्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांना कठीण झाले होते. मात्र, नुकतेच सहप्रवासी महिलेचे ५० हजार रुपये लांबविल्यानंतर रिक्षाचा क्रमांक सीसीटीव्हीत कैद झाला. त्यावरुन पोलिसांनी या चौकडीचा अवघ्या २४ तासात शोध घेतला.
मुलाच्या शिक्षणासाठी मालेगावहून ५० हजार रुपये आणल्यानंतर नाशिकच्या बसने कल्पना विजयचंद जैन 7 नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बाबा पेट्रोल पंप चौकात उतरल्या होत्या. तेथून त्या अब्दुल लतीफ शेख इब्राहिम यांच्या रिक्षा (क्रमांक एमएच-२०-डीसी-२९१२) मध्ये बसल्या. तत्पुर्वी या रिक्षात आशाबाई नारायण उमप उर्फ उनपे (वय ५०,रा. नारायणवाडी, चाळीसगाव) व तिच्या दोन भाच्या शितल गोकुळ कसबे उर्फ कासोदे (३०, रा.पंचवटी,देवपुर, धुळे) आणि अनिता विजय ससाणे (२६, रा. हरी विठ्ठलनगर रोड, जळगाव) या रिक्षात बसलेल्या होत्या. चिकलठाण्याच्या दिशेने रिक्षा जात असताना या तिघींनी जैन यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. याचवेळी एकीने त्यांच्या पर्समधील पन्नास हजारांची रोकड अलगद काढून घेतली.
त्यानंतर कल्पना जैन रिक्षातून खाली उतरल्या आणि रिक्षा चिकलठाण्याच्या दिशेने निघून गेली. त्यानंतर जैन यांनी पर्स तपासली असता त्यातील पन्नास हजारांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जैन यांनी तात्काळ मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
यावेळी मुकुंदवाडी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केली. त्यात रिक्षाचा क्रमांक पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यावरुन मुकुंदवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बांगर, सहायक फौजदार कौतिक गोरे, जमादार रवि शिरसाठ, शिपाई शेख असलम, कैलास काकड, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, सुनील पवार, मनोहर गिते, संतोष भानुसे, सुधाकर पाटील यांनी रिक्षाचालक अब्दुल लतीफ याचा शोध घेतला. त्याला पकडल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत या तिन्ही महिलांची नावे सांगितली.