औरंगाबाद - शहरात मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या भागांमध्ये दोन मंगळसूत्र चोरीच्या ( Aurangabad Robbery Case ) घटना घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात एका घटनेत महिलेने प्रसंगावधान दाखवल्याने मंगळसूत्र वाचले आहे, मात्र सतत होणाऱ्या घटना थांबणार कधी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
आकाशवाणी चौकाजवळ विरुध्द दिशेने आलेल्या दोन दुचाकीस्वार चोरांनी महिलेचे बारा ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने प्रसंगावधान ओळखून तत्परता दाखविल्यामुळे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हातात राहिले. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. प्रतिभा सुनील राठोड (38, रा. न्यू शांतीनिकेतन कॉलनी) या सायंकाळी सुमारास आकाशवाणी चौकातील रिलायन्स मॉलमध्ये जात होत्या. त्यावेळी विरुध्द दिशेने रिलायन्स मॉलच्या अलीकडे दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या अंदाजे 30 वर्षीय चोराने राठोड यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. यात चोराच्या हाती बारा ग्रॅमचे मंगळसूत्र लागले. या घटनेनंतर महिलेने जवाहरनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.
भामट्याने वृध्देला लुबाडले -
किराणा सामान आणण्यासाठी जाणाऱ्या वृध्दाला रेशनचे गहू, तांदूळ मिळवून देतो, असे आमिष दाखवून भामट्याने सोन्याचे मणीमंगळसूत्र लांबवले. ही घटना सिडको, एन-6 भागात घडली. कासाबाई बालु कोरडे (50, रा. टाऊन सेंटर, सिडको) या टाऊन सेंटर येथे सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी पतीसोबत वॉचमन म्हणून काम करतात. दुपारी तीनच्या सुमारास त्या किराणा सामान आणण्यासाठी जात होत्या. त्यावेळी एका 30 वर्षीय भामट्याने त्यांना गाठले. गरीबांसाठी फुकटात गहू, तांदूळ व पैसे वाटप सुरु असल्याचे त्याने सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवत कासाबाई त्याच्यासोबत सिडको, एन-6 भागात गेल्या. त्यावेळी धान्य वाटपाच्या ठिकाणी सोने दाखवावे लागते. तेव्हा तुम्ही गळ्यातील मणीमंगळसूत्र काढून माझ्याकडे द्या, असे म्हणत भामट्याने कासाबाईचे दागिने हस्तगत केले. त्यानंतर दागिने दाखवून फुकटात धान्य आणि पैसे मिळवून देतो तुम्ही येथेच थांबा म्हणत भामटा पसार झाला. बराचवेळ झाला तरी भामटा येत नसल्याचे पाहून कासाबाई या घरी परतल्या. त्यानंतर त्यांनी सिडको पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.
हेही वाचा - Terrible accident in Amba Ghat : आंबा घाटात भीषण अपघात! २ महिन्याच्या बाळासह एका महिलेचा मृत्यू