औरंगाबाद - आपण भुरट्या चोरांनी चोऱ्या केल्याच्या घटना ऐकल्या असतीलच. साहजिकच भुरटे चोर म्हणल्यावर ते दुचाकी, चारचाकी किंवा इतर वाहनांमधून येऊन चोरी करत असतात. मात्र, औरंगाबादमध्ये अशा एका चोराला अटक केली आहे, जो पठ्ठ्या चोऱ्या करण्यासाठी चक्क विमानाने प्रवास करत असे...थक्क झालात ना, तर मग वाचा...
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, आंध्रप्रदेश व कर्नाटक अशा विविध राज्यांमध्ये घरफोडी करण्यासाठी एक चोरटा चक्क विमानाने प्रवास करत असे. चोरीसाठी अत्याधुनिक साहित्यांचा वापर करत असे. तसेच तो आलिशान चारचाकी कार भाड्याने घेऊन शहरात तो फिरायचा. या कामासाठी त्याला त्याचा एक साथीदार मदत करत असे. ज्या शहरात जाईल त्या शहरात चोरी करायची, त्या ठिकाणी दोन दिवस मुक्कामाला राहून पुन्हा दुसऱ्या शहरात तो विमानाने जायचा. अशा या चोराला औरंगाबाद पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्याने शहरातील तीन दुकाने फोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुजारा माली आणि जितेंद्रकुमार मांगीलाल माली अशी आरोपींची नावे आहेत.
शहरातील गोमटेश मार्केट समोरील बलदवा बिल्डिंगमध्ये पशुसेवा औषधाचे दुकान आहे. एक ऑगस्टला रात्री या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानातील सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन तपास सुरू केला. त्यावेळी सुजारा माली आणि जितेंद्रकुमार माली हे पुणे येथे दडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी पुणे घाटात बस स्थानक परिसरातील एका हॉटेलवर छापा मारला असता दोघेही तिथे सापडले.
दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून हे दोघेही घरफोड्या करण्यासाठी विविध शहरात चक्क विमानाने फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याविरोधात पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, हैदराबाद, दिल्ली, बंगळुरु, अहमदाबाद, जयपूर या विविध शहरांमध्ये 40 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. चोरलेले सोने गहाण ठेवून त्यावर हे चोरटे पैसे मिळवत असल्याचे देखील समोर आले आहे.