औरंगाबाद - सिल्लोड मतदारसंघ भाजपने अब्दुल सत्तार यांच्यासाठी शिवसेनेला दिल्याने नाराज झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. सिल्लोड येथे भाजप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन पहिल्या टप्प्यात 300 पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे.
युतीत असताना गेली 25 वर्ष सिल्लोड मतदारसंघात भाजपने विधानसभा निवडणूक लढवली. त्यात 15 वर्ष भाजपचा आमदार या मतदारसंघात निवडणून आला होता. मागील दहा वर्षात अब्दुल सत्तार काँग्रेसचे आमदार असताना भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्ष वाढवण्याचे काम केले. मात्र, आज अचानक हा मतदारसंघ सत्तार यांच्यासाठी शिवसेनेला दिल्याने भाजपचे कार्यकर्ते अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याने राजीनामा देत असल्याचे मत नाराज कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर ते भाजपात येतील अशी शक्यता निर्माण झाली असताना सिल्लोड येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत दबाव तंत्राचा वापर करून अब्दुल सत्तार यांचा पक्ष प्रवेश थांबवला. मात्र, त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करत भाजपच्या स्थानिक नेत्यांना धक्का दिला. वरच्या पातळीवरच्या राजकारणात सिल्लोड येथील भाजप पदाधिकाऱ्यांनाचा विरोध लक्षात घेऊन अब्दुल सत्तार यांना शिवसेना प्रवेश देऊन हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. या राजकीय खेळीमुळे अब्दुल सत्तार यांचे पुनर्वसन देखील झाले आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध मोडीस काढण्यात आला.
हेही वाचा - औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात मित्र पक्षाचा सेनेला धोका
या सर्व घडामोडीनंतर अब्दुल सत्तार आता शिवसेनेकडून विधानसभेचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे आता भाजप पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा हाती घेत सामूहिक राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवले असून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरून सत्तार यांना पराभवाचा धक्का देणार असे नाराज कार्यकर्त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सिल्लोडच्या भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे बंड झुगारून अब्दुल सत्तार आपले अस्तित्व टिकवणार का हे पाहण्यासारखे असणार आहे.
हेही वाचा -मराठवाडा : वर्चस्वासाठी सेना-भाजपची रस्सीखेच, तर आघाडीची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड