सिल्लोड (औरंगाबाद) - सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. सरकारी यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या लढाईत कर्तव्य बजावत आहे. याचा गैरफायदा घेत तालुक्यातील काही वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा करण्याचा सपाटा लावला आहे. यावर सिल्लोड महसूल विभागाच्या पथकाने मोढा खु. आणि सावखेडा बु. येथील पूर्णा नदीत छापा टाकून वाळू माफियांवर मोठी कारवाई केली आहे.
कोरोनाच्या लढ्यात सरकारी यंत्रणा गुंतली असताना वाळू माफियांनी रात्रंदिवस वाळू उपसा व वाहतूक सुरू केल्याने उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील तसेच तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संजय सोनवणे यांच्या पथकाने बुधवारी रात्री अचानक तालुक्यातील मोढा खु. शिवारातील पूर्णा नदीपात्रामध्ये छापा टाकला. यावेळी नदीमध्ये अवैध गौणखनिज उत्खनन होताना दिसून आले.
या कारवाईत सत्यम सांडू महाकाळ (रा. मोढा खु.) यांच्या मालकीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर (एमएच 20 इजे 1283) जप्त करण्यात आला. सदरील वाहन जप्त करून त्यांच्या विरोधात 1, 30 ,400 रुपयांची दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित केलेली आहे.सदर कार्यवाही पथक प्रमुख तथा नायब तहसीलदार संजय सोनवणे, तलाठी विजय चव्हाण, काशिनाथ ताठे, विजय राठोड, संतोष इंगळे, महेंद्र वारकड, संजय जोशी, कोत वाल दत्तू साळवे, राजू बसैय्ये, ज्ञानेश्वर बनकर आदींनी पूर्ण केली. यापुढे अशा पद्धतीने अचानक छापा टाकून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील व तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी इशारा दिला आहे.
शुक्रवारी दुसरी कारवाई
दरम्यान, महसूल विभागाच्या याच पथकाने शुक्रवार (दि. 29) रोजी सावखेडा बु शिवारातील पूर्णा नदीपात्रामध्ये छापा मारला. यावेळी येथे अवैध गौणखनिज उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत कदमसिंग किसन लोधवाल (रा. बोरगाव वाडी) यांचा ट्रॅक्टर (एमएच 21 एडी 1936) व शरद गणपत भोजने (रा. सावखेडा बु.) यांचे विनानंबर फर्ग्युसन कंपनीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. संबंधितांकडून प्रत्येकी एक ब्राससाठी रक्कम रू. 1, 30, 400 असे एकूण रक्कम रू. 2, 60, 800 रुपयांची दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित केली आहे.