औरंगाबाद - महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) आरक्षण सोडत घेण्यात आली. सकाळी 10 च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात ही प्रक्रिया पार पडली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लवकरच महानगर पालिकेची निवडणूक जाहीर करण्यात येणार आहे.
औरंगाबाद महानगर पालिकेच्या आरक्षण सोडतीत दिग्गजांचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 115 वॉर्डपैकी 60 वॉर्ड सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी आरक्षित आहेत. त्यामध्ये 30 वॉर्ड महिलांसाठी आरक्षीत ठेवण्यात आले आहेत, तर 31 वॉर्ड ओबीसी प्रवर्गासाठी असून, त्यामध्ये 16 वॉर्ड महिलांसाठी आरक्षीत असल्याची माहिती मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.
एप्रिल 2020 मध्ये औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी अनेकांनी आपल्या वॉर्डमध्ये कामाला सुरुवात केली आहे. मात्र, वॉर्ड आरक्षण जाहीर नसल्याने अनेकांनी आपल्या तयारीला ब्रेक लावला होता. डिसेंबर महिन्यात सोडत होणार होती, मात्र काही कारणास्तव उशीर झाला. सकाळी दहाच्या सुमारास सोडत होत असताना इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात गर्दी केली होती. वॉर्ड क्रमांकाच्या चिठ्ठ्या महानगर पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून काढून सोडत प्रक्रिया पार पडली. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.