छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : लवकरच 'एक देश एक कायदा' लागू होईल, असे संकेत केंद्राच्या मंत्र्यांकडून आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून दिले जात आहेत. त्याबद्दल सामाजिक विषयांवर चर्चा घडवण्यासाठी 'एमआयएम' पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी पुढाकार घेतला आहे. उद्या (मंगळवारी) शहरातील तापडिया नाट्यमंदिर येथे समाजातील प्रतिष्ठित नागरिकांसोबत या विषयावर ते चर्चा करणार आहेत. इतकचं नाही तर याबाबत पक्षाची भूमिका ते मांडणार आहेत.
ओवेसी मांडणार स्वत:ची भूमिका : देशात समान नागरी कायदा निर्माण करण्याच्या हालचाली सध्या सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनापैकी एक आश्वासन हे मानले जाते. राम मंदिर याच्यासह इतर सर्व आश्वासने पूर्ण केली असल्याचा दावा भाजपकडून याआधी केला गेला. त्यात आता 'एक देश एक कायदा' करणार अशी माहिती केंद्राच्या मंत्र्यांकडून दिली गेली. मात्र, हा कायदा देशातील मुस्लिम समाजाविरोधात असल्याची चर्चा आहे. त्यात आता एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी आपले मत मांडणार आहेत. यासाठी समाजातील विविध प्रतिष्ठित नागरिकांशी ते चर्चा साधतील. त्यात डॉक्टर, वकील, अभियंते, सामाजिक संघटनांचे प्रमुख यांना आमंत्रित करण्यात आले आहेत. नवीन कायद्याबाबत काय वाटते आणि पक्षाची काय नेमकी भूमिका आहे याबाबत तापडिया नाट्यमंदिर येथे मंगळवारी चर्चासत्र भरवण्यात आले आहे. त्यामुळे ओवेसी यावेळी नेमक्या कोणत्या मुद्द्यांना घेऊन समान नागरी कायद्याला विरोध करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुस्लिम अभ्यासकांची मातोश्री भेट : समान नागरी कायद्याबाबत देशातील मुस्लिम समाजाने विरोध दर्शवला आहे. काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील मुस्लिम पर्सनल लॉ च्या अभ्यासकांनी, मौलवींनी मातोश्री येथे जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. देशात भाजप मुस्लिम लोकांना टार्गेट करण्यासाठी प्रयत्न करत असून समान नागरी कायदा हा त्याचाच एक भाग असल्याचे त्यावेळी काही नागरिकांनी मत व्यक्त केले होते.
'या' भागात एमआयएमची ताकद वाढली : मराठवाड्यात 'एमआयएम' पक्षाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे 'एमआयएम' पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी समान नागरी कायद्याबाबत काय मत मांडतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. इतकंच नाही तर या कार्यक्रमानंतर नवीन कायद्याला विरोध करण्यासाठी चळवळ सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.