औरंगाबाद - वाढत्या तापमानाचा फटका सर्वसामान्यांना बसतो, निवडणुकीच्या काळात उन्हामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना प्रचार करणे अवघड झाले आहे. वाढत्या उन्हाचा फटका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना बसला आहे. उन धावपळीमुळे दानवे यांची प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
निवडणुकीच्या धामधुमीत कामाचा ताण जास्त झाल्याने, रावसाहेब दानवे यांना ताप आला आहे. घशाला इन्फेक्शन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुकीत प्रचाराने राजकीय वातावरण तापत असताना दुसरीकडे सूर्यदेखील तापत चालला आहे. वातावरण ४० अंशावर जात असल्यामुळे युतीचा प्रचार करणे देखील अवघड झाले आहे. १२ ते ५ या काळात घराच्या बाहेर पडणेदेखील अवघड होत चालले आहे. निवडणुकीची धामधुमीमुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना वाढत्या तापमानाचा फटका बसला.
ऐन प्रचाराच्या काळात रावसाहेब दानवे यांना ताप आणि 'व्हायरल इन्फेक्शन' झाले आहे. गेले दोन दिवस आजारी असल्याने रावसाहेब दानवे यांना स्वतःच्या किंवा पक्षाच्या प्रचारासाठी बाहेर पडता आलेले नाही. रावसाहेब दानवे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.