औरंगाबाद - 'पाण्यात भाषण केल्याने चांगले यश मिळते', असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांना लगावला आहे. शरद पवार यांनी लोकसभा पोटनिवडणुकीवेळी भर पावसात भाषण केल्याने त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. आज दानवे यांनी औरंगाबादेत पावसातील भाषणाबाबत वक्तव्य केल्याने पुन्हा चर्चा रंगली आहे.
औरंगाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पावसात भाषण केले. पावसामुळे कमी वेळेत कार्यक्रम उरकला असला, तरी पावसात झालेल्या भाषणांनी राजकीय चर्चा सुरू झाल्या.
2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत सातारा येथील प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात केलेल्या भाषणाची प्रचंड प्रसिद्धी आणि चर्चा झाली होती. त्याचा परिणाम सर्वांनी विधानसभा निवडणुकीत देखील अनुभवला होता. त्या भाषणाला आता केंद्रीयमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात आलेल्या पावसात रावसाहेब दानवे यांनी भाषण केले. पाण्यात भाषण केले की यश मिळते, असे दानवे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी हसून दाद दिली.
केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंचा फज्जा -
औरंगाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम करू नये, जास्त गर्दी करू नये, कोणत्याही कार्यक्रमात दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर पाळावे, असे नियम केंद्र सरकारनेच घालून दिले आहेत. असे असताना केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमातच सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले. आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे सांगितले होते. पण कार्यकर्ते आणि लोक पाळत नाहीत, असे अजब उत्तर दानवे यांनी दिले.