औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी काढलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाली आहे. पंतप्रधान पीक विमा नसून ही तर कार्पोरेट कल्याण योजना आहे, ज्या माध्यमातून अनेकांनी पैसे कमावले आहेत, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. त्यांनी आज मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकारवर आरोप केले.
हवामान खात्याला कोणी गांभीर्याने घेत नसून, या खात्याचा कुठला अंदाज खरा होत नाही. त्यामुळे एखाद्या कंपनीचे बियाणे खपवण्यासाठी चुकीचा अंदाज तर लावला जात नाही ना, याचा तपास द्यावा, असे देखील राजू शेट्टी म्हणाले. सध्या महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळग्रस्त झाला आहे. या सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा पीक विमा काढला असून त्यांना पीक विमा मात्र मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे सांगितले होते. मात्र, याच योजनेतून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. विम्याच्या माध्यमातून यावर्षात जवळपास १७ हजार ९८२ कोटी जमा झाले होते. त्यापैकी फक्त ४ हजार २०९ कोटीचे वाटपही शेतकऱ्यांना करण्यात आले होते. तर दुसरीकडे २०१७-१८ या आर्थिक वर्षात २० हजार ७०७ कोटी रुपये हे विमा कंपनीकडे जमा झाले असून, त्यापैकी फक्त ४ हजार २९१ कोटीचे वाटप झाले आहेत. या दोन वर्षांमध्ये जवळपास १९ हजार ४५४ कोटींचा नफा या विमा कंपन्यांनी कमवला आहे. दुष्काळी भागात जर या सर्व कंपन्यांनी खरच शेतकऱ्यांना मदत केली असती तर शेतकरी मजेत असते आणि या विमा कंपन्या तोट्यात असत्या मात्र तसे झाले नाही. या सर्व विमा कंपन्यांच्या माध्यमातून मोठा घोटाळा समोर आला आहे. त्यामुळे ही योजना पीक विमा योजना नसून कार्पोरेट कल्याणकारी योजना आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
या फसवेगिरीला सरकार जबाबदार असून यामधून मोठे घोटाळे समोर येतील, विमा कंपन्यांनी बदमाशी केली असून असे करण्यामध्ये कृषी विभाग, महसूल विभाग आणि काही अधिकारी यात समाविष्ट असल्याशिवाय ही फसवणूक होणार नाही, असे देखील राजू शेट्टी यांनी सांगितले. राज्यात सध्या कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, या प्रयोगाला यश मिळणार नाही असे मला वाटते, कारण हवामान खात्याच्या या विभागाला कोणीच गांभीर्याने घेत नसून, या विभागात खरंच चांगली लोक आहेत का, हे तपासण्याची वेळ आलेली आहे. कारण जगामध्ये आता तंत्रज्ञान पुढे गेले आहे आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिवसाची पूर्ण हवामानाची माहिती आता सध्या मिळत आहे मात्र, ती माहिती आपल्या हवामान खात्याला मिळत नाही. त्यामुळे यंत्रणा जुनी आहे का? किंवा तिथे भरलेली माणसे योग्य आहेत का? हे देखील तपासण्याची गरज आहे. इतकेच नाही तर काही विमा कंपन्यांचा खते किंवा बियाणे हे विकली जावीत म्हणून चुकीचा अंदाज घेतला जात नाही ना? हे देखील तपासावे लागेल, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
दुष्काळामुळे फळबाग शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत त्यांना विम्याच्या रकमेची अत्यंत गरज आहे. मात्र, त्यांना अद्याप मिळालेला नाही लवकरच त्यांना विम्याची रक्कम दिली गेली नाही तर, फळ उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील शेतकरी सध्या दुष्काळ आणि हवालदिल झाला आहे, अशा परिस्थितीत त्याला पीक विमा तर मिळालाच नाही, मात्र त्याला आता नव्याने पेरणीसाठी कर्जाची आवश्यकता आहे तेदेखील शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे पुढील महिनाभरात जर या सर्व शेतकऱ्यांना कर्जाची उपलब्धता झाली नाही, तर विभागीय आयुक्त कार्यालयावर बेमुदत घेराव आंदोलन करणार असल्याचा इशारा, राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला.