औरंगाबाद : नेपाळ येथे होणाऱ्या सातव्या मास्टर्स आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत औरंगाबादचे राजेश भोसले ( Rajesh Bhosale ) पाटील देशाचे नेतृत्व करणार आहेत. पन्नास वर्ष वरील वयोगटात ते खेळणार असून जलतरण सोबत मैदानी खेळ अशा दुहेरी प्रकारात ते आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
जलतरण क्रिडाप्रकारात सहभाग - नेपाल (पोखरा) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेणारे राजेश भोसले 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर फ्री स्टाईल जलतरण क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर थाळी फेक व भाला फेक क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. मागील वर्षी गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी पदक मिळविले होते. त्यामुळे ही संधी मिळाली असून, या वयातही देशाचे प्रतिनिधित्व करता येत असून दुहेरी प्रकारात खेळता येणार असल्याने आपल्याला आनंद होत आहे. नव्या पिढीला चालना देता येईल. देशासाठी खेळणार असल्याचे, राजेश भोसले यांनी सांगितले.
रोज सहा तास सराव - जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले राजेश भोसले एमजीएम जलतरण तलावावर रोज सराव करतात. संस्थेने त्यांना सरावासाठी विशेष सुट देण्यात आली आहे. सकाळी तीन तास आणि सायंकाळी पुन्हा सराव असा दिनक्रम त्यांचा असतो. गेल्या 35 वर्षांपासून त्यांच्या सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. खुल्या आणि समुद्री प्रकारात त्यांनी आपले कौशल्य दाखवले.
पर्यावरणासाठी केला विक्रम - जलतरण प्रकारात आपले कौशल्य जपताना त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी देखील आपला हातभार लावला आहे. पर्यावरण बचाव संदेश देण्यासाठी सलग 13 तास, 20 तास आणि 24 तास पोहण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. तर पर्यावरण चांगले असेल तर खेळाडू घडू शकतात, त्यामुळे आतापर्यंत एक लाख पिंपळाची झाडे लावले असल्याची माहिती जलतरणपटू राजेश भोसले यांनी दिली.