औरंगाबाद - शिवजयंती हा कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस नाही, हा आपला सण आहे. आपले सण आपण तिथीनुसारच साजरा करीत असतो. त्यामुळे महाराजांची जयंती आपण तिथीनुसारच साजरी करणार, असे प्रतिपादन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादेत केले.
शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार असावा की तारखेनुसार यापेक्षा महाराजांची जयंती रोज साजरी केली पाहिजे, असे मतही ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी शालेय मुलांनी आणि तरुणांनी मैदानी खेळ साजरा करत जल्लोष केला.
क्रांतिचौक भागात सकाळी 10 वाजता या शिवजन्मोत्सवाला सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराज की जय घोषणांनी वातावरण आनंददायी झाल्याचे दिसून आले. शाळकरी मुलांनी लेझीम आणि शिवकालीन युद्ध पद्धतीचा उत्तम नमुना सादर केला. युवकांच्या ढोल पथकाने वातावरणात वेगळाच उत्साह भरला होता. दुपारी बाराच्या सुमारास राज ठाकरे व्यासपीठावर दाखल झाले. त्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
कोरोनामुळे जयंती रद्द करा असे प्रशासन म्हणत होते. मात्र, आपल्याकडे पहिलीच खूप मोठी रोगराई आहे, त्यात ही एक आली यात नवल ते काय? असा सवाल ठाकरे यांनी यावेळी केला.