औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय विधिविद्यार्थी संघटनेच्यावतीने दरवर्षी 'फिलिप जोसेफ आंतरराष्ट्रीय कायदा अभिरूप न्यायालय स्पर्धा' घेण्यात येते. यावर्षी नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाइन स्पर्धेत औरंगाबादच्या राहुल देसरडा यांना उत्कृष्ट वादविवादपटूचा (ओरॉलिस्ट) सन्मान मिळाला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या स्पर्धेत ९० देशांतील ५७४ संघांनी २ हजार ३६ अभिरूप न्यायालय (मूट कोर्ट) फेऱ्यांमध्ये सहभाग घेतला होता. खंड आणि देशनिहाय पद्धतीने तब्बल ३ हजार तास चाललेल्या या स्पर्धेचे परीक्षण जगभरातील १ हजार १०० ख्यातनाम विधिज्ञ, न्यायाधीश आणि विधि प्राध्यापकांनी केले. भारतातील 'जिंदल ग्लोबल लॉ स्कूल'चा संघ आशिया फेरी, जागतिक प्राथमिक फेरी, जागतिक प्रगत फेरील आणि इलिमिनेशन फेरी जिंकून अंतिम फेरीत पोहोचला. या संघाचे नेतृत्त्व राहुल देसरडा यांनी प्रभावीपणे केले. त्यामुळे जिंदल संघ डबल ऑक्टा अंतिम फेरीत विजयस्थानी पोहोचला.
'जिंदल ग्लोबल लॉ स्कूल' संघाच्या कामगिरीसाठी त्यांना हार्डी.सी. डिलार्ड अवॉर्ड सोबतच प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच औरंगाबादचे रहिवासी असलेल्या राहुल देसरडा यांना उत्कृष्ट वादविवादपटूचा (ओरॉलिस्ट) सन्मान मिळाला. जगभरातील ५९१ स्पर्धकांत १६ वा उत्कृष्ट वक्ता म्हणून राहुलला गौरविण्यात आले. राहुल हे प्रसिद्ध अर्थतज्ञ प्रा. एच.एम.देसरडा व शकुंतला देसरडा यांचे नातू आहेत. जनहित याचिकांच्या माध्यमाने यापुढे समतामूलक शाश्वत विकासासाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे. सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, प्रख्यात विचारवंतांनी राहुलचे अभिनंदन केले.