औरंगाबाद - आयसीस ( ISIS ) या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका विधीसंघर्ष बालकाला 3 वर्षे स्पेशल होममध्ये ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष प्राधिकृत न्यायालय औरंगाबाद येथे हा खटला चालू होता. त्यात बाल न्याय मंडळ औरंगाबाद ( Aurangabad Court ) येथे अंतिम अहवाल सादर करण्यात आला होता. मागील दोन वर्षांपासून खटल्याची सुनावणी सुरू होती. पहिल्यांदाच दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याने अशा पद्धतीची अल्पवयीन आरोपीला शिक्षा झाली आहे.
विधीसंघर्ष बालकाविरोधात चालला खटला - बाल न्यायमंडळ औरंगाबाद यांनी विधी संघर्ष बालकाविरोधातील खटल्यात अंतिम निकाल दिला असून त्यास कलम 120 व भा.दं.वि.चे कलम 18, 20, 38, यु.ए.पी.ए. ( UAPA ) अन्वये आरोप सिद्ध झाले असून संबंधित बालकाला दोषी ठरविण्यात आले आहे. संबंधितास बाल न्यायअधिनियम कलम 18 (जी) च्या तरतुदीनुसार तीन वर्षे स्पेशल होममध्ये ठेवण्याचे निकालामध्ये आदेश पारीत केले आहे.
2019 मध्ये झाली कारवाई - दहशतवाद विरोधी पथक, औरंगाबाद युनिट यांना ISIS या संघटनेशी संबंधीत यातील आरोपी व विधीसंघर्षीत बालकाविरोधात ऑगस्ट, 2019 मध्ये गोपनिय माहिती प्राप्त झाली होती. आरोपींनी 'उम्मत-ए-मोहम्मदीया ग्रुप तयार करून ISIS या संघटनेच्या विचारांनी प्रेरीत होऊन विशिष्ट धर्मीयांच्या धार्मीक कार्यक्रमाच्यावेळी प्रसादामध्ये, जेवणामध्ये पाण्यामध्ये विष मिळवून मोठ्या प्रमाणात जिवीत हानी करण्याची योजना आखल्याचे समजले होते. तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थांचा वापर करून मुंबई, ठाणे, औरंगाबाद या ठिकाणाची रेकी केल्यानंतर दहशतवादी हल्ला करून सर्वजण सिरीयामध्ये पळून जाणार होते, अशी माहिती मिळाली होती.
दहा जण होते अटकेत - त्यानुसार मोहसिन सिराजुद्दीन खान (रा. मुंब्रा, ठाणे), मजहर अब्दुल रशिद शेख (रा. ठाणे), मोहम्मद तकी सिराजुद्दीन (रा. मुंब्रा, ठाणे), मोहम्मद मुशाहिद उल इस्लाम अब्दुल माजीद (रा. औरंगाबाद), मोहम्मद सर्फराज अब्दुल हक उस्मानी (रा. मुंब्रा, ठाणे), जमान नवाब खुटेउपाड (रा. मुंब्रा, ठाणे), सलमान सिराजुद्दीन खान (रा. मुंब्रा, ठाणे), फहाद मोहम्मद इस्तेयाक अन्सारी (रा. मुंब्रा, ठाणे), तल्हा हनिफ पोतरीक (रा. मुंब्रा, ठाणे) तसेच एक अल्पवयीन मुलगा, अशा दहा जणांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) विषेश प्राधिकृत न्यायालय, औरंगाबाद येथे खटला चालवण्यात आला. त्यातील अल्पवयीन मुलाबाबत अंतिम निकाल आला असून त्याला तीन वर्षे स्पेशल होममध्ये ठेवण्याची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
हेही वाचा - Aurangzeb : दिल्लीचा शहेनशहा औरंगजेबाची का आहे खुलताबादेत कबर, जाणून घ्या सविस्तर माहिती