औरंगाबाद - राज्यात पावसामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे 2600 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, मराठवाड्यात रस्ते दुरुस्तीसाठी 550 कोटी रुपयांची तरतूद असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधाकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
पावसामुळे राज्यातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी 2 हजार 600 कोटींची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये औरंगाबाद विभागात पाचशे पन्नास कोटींची मदत देण्यात येणार आहे. नुकतेच शेतीसाठी देखील मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कुठे कुठे कशा पद्धतीचे नुकसान झाले आहे. त्याबाबत पाहणीला सुरुवात केली आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. अशोक चव्हाण आज औरंगाबाद दौऱ्यावर आले असताना यावेळी त्यांनी चिकलठाणा, पळशी, अंजनडोह या भागातील रस्त्यांची पाहणी केली.
गेल्या पाच वर्षांत मराठवाड्याकडे दुर्लक्ष
गेल्या पाच वर्षांत मराठवाड्याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र आता कोरोनाची साथ अटक्यात येत आहे. त्यामुळे आपल्याला परत पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे आमचा पाहणी दौरा सुरू आहे. लवकरच नुकासानाचा आढावा घेतला जाईन, आणि योग्य ती मदत दिली जाईल. रस्त्यांसाठी जाहीर करण्यात आलेले पैसे फक्त दुरुस्तीसाठी आहेत. त्याच्यामध्ये मराठवाड्यातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे खूप मोठं नुकसान झाले आहे. मराठवाड्यासाठी एशियन बँकेकडून मदत घेण्याचे नियोजन सुरू असल्याचेही चव्हाण यावेळी म्हणाले.
राज्य सरकार पाडण्याचा भाजपचा डाव
राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री करत आहेत. हा आरोप खरा आहे. रोजच असे प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये राज्य सरकार पाडण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात येत आहेत. मात्र आम्ही खंबीर आहोत. राज्यातील सरकार स्थिर आहे. महाविकास आघाडी सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.