औरंगाबाद - जिल्ह्यात नऊ विधानसभा क्षेत्रात एकूण 133 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये सर्वाधिक उमेदवार औरंगाबाद पूर्व विधानसभा क्षेत्रातून 34, तर सर्वात कमी सात उमेदवार सिल्लोड विधानसभा क्षेत्रातून आहेत. मतदारांनी 21 ऑक्टोबर रोजी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात तीन हजार 24 मतदान केंद्रात एकूण 28 लाख 54 हजार 280 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदान केंद्रांपैकी 345 मतदान केंद्रांवर वेब कास्टींग सुविधा उपलब्ध आहेत. 18 ठिकाणी सखी, 18 ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे उभारली आहेत. दिव्यांगांना मतदानासाठी अडचण होऊ नये, या दृष्टीने दिव्यांगांसाठी आवश्यक त्या सुविधाही मतदान केंद्रांवर आहेत. जिल्ह्यात एकूण 19 हजार 687 दिव्यांग मतदार यंदा मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये सर्वाधिक चार हजार दिव्यांग मतदार कन्नड विधानसभा मतदार क्षेत्रात आहेत. तर सर्वात कमी एक हजार 471 दिव्यांग मतदार औरंगाबाद पूर्व मतदार संघात आहेत.
हेही वाचा - धनंजय मुंडेंच्या 'त्या' वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल; सुमोटो दाखल
मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रशासनाकडून तीन हजार 24 मतदान केंद्रावर पुरेशा प्रमाणात बॅलट, नियंत्रण युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे आहेत. राखीव यंत्राची व्यवस्थाही आहे. या सर्व केंद्रांवर एकूण 13 हजार 306 अधिकारी-कर्मचारी असणार आहेत. तर 339 क्षेत्रीय अधिकारी आहेत. 144 मतमोजणी अधीक्षक, त्यांना सहाय्य करण्यासाठी 279 आणि सुक्ष्म निरीक्षक 144 अशाप्रकारे 567 मनुष्यबळाची व्यवस्था आहे. खर्च नियंत्रणासाठीही सक्षम यंत्रणा देखील आहे.
हेही वाचा - संजय राऊतांना डच्चू; सेनेच्या 'या' अधिकृत यादीतून नाव वगळले
विधानसभा 2009 मध्ये 65.20 टक्के पुरूष मतदार आणि 58.77 महिला मतदार असे एकूण 62.17 टक्के मतदान झालेले आहे. 2014 मध्ये 70.49 टक्के पुरूष, 68.34 महिला मतदार अशा एकूण 69.33 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.