औरंगाबाद - लॉकडाऊन काळात अवैधरित्या दारू तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कन्नड तालुक्यातील शेलगाव येथेही दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णानदीलगत दोन व्यक्ती अवैधरित्या विक्री करण्यासाठी दारुची वाहतूक करत असल्याची माहिती पिशोर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पिशोर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी एका दुचाकीवर दोन व्यक्ती पिशवीत काहीतरी घेऊन जाताना आढळले.
पोलिसांनी पिशवी तपासली असता, त्यात ५८८ देशी दारुच्या बाटल्या आढळल्या. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांचा ताब्यातून एक दुचाकी व देशी दारूच्या बाटल्या असा एकूण ४८ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.