औरंगाबाद - माहितीच्या आधिकाराखाली महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना बदनामी करण्याची धमकी देत ८ लाखांची खंडणी घेणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासह तिघांना सिडको पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिडको, एन-५ परिसरातील संत तुकाराम नाट्यगृहाजवळ करण्यात आली.
याप्रकरणी पोलिसांनी मुख्य खंडणीखोर उदय अरुणराव पालकर (वय ४६ वर्षे, रा. टाऊन सेंटर, श्रीयोग अपार्टमेंट, एन-५, सिडको), भानुदास शंकर मोरे (वय ३१ वर्षे, रा. जयभवानीनगर, वरद हायस्कुलजवळ), अमोल सांडु साळवे (वय ३५ वर्षे, रा. गुलमोहर कॉलनी, प्लॉट क्र २०/२, एन-५, सिडको) यांना अटक केली आहे.
मिलकॉर्नर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरेश लक्ष्मण गणेशकर (वय ५५ वर्षे, रा. एन-४, सिडको) हे तीन वर्षांपासून मुख्य अभियंता या पदावर कार्यरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरविणारा उदय पालकर वीज कंपनीच्या कार्यालयात वेगवेगळी माहिती घेण्यासाठी माहिती अधिकाराखाली अर्ज करत होता. त्याने गणेशकर यांच्या पदोन्नतीबाबत माहिती मागितली होती. तेव्हा त्याच्या अर्जाच्या अनुषंगाने कार्यालयाने त्याला संपूर्ण माहिती दिली.
मात्र, १९ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास तो पुन्हा कार्यालयात आला. यावेळी त्याने गणेशकर यांना तुमच्या कार्यालयातील कर्मचारी व तुमची वैयक्तीक माहिती मागितल्यानंतर देखील तुम्हाला काहीच फरक पडत नाही का, असे म्हणत धमकावले. त्यावर गणेशकर यांनी आपले काय चुकले ते सांगा असे विचारले. तेव्हा पालकरने त्यांना तुमच्याशी कामाचे बोलायचे आहे. अन्यथा तुमची बदनामी करुन पितळ उघडे पाडीन अशीही धमकी दिली.
तेव्हा गणेशकर यांनी जे काही बोलायचे आहे. ते इथेच बोला असे म्हणाले. त्यावर त्याने मी येथे काही बोलु शकत नाही. तुम्हीच माझ्यासोबत बाहेर चला असे म्हणाला. मात्र, गणेशकरांनी त्याला खडसावत बाहेर येणे जमणार नाही, असे सांगितले. तसेच आपला एक कर्मचारी तुमच्यासोबत बोलण्यासाठी बाहेर पाठवतो, असे म्हणाले. यानंतर पालकर कार्यालयातील लिपीक विनोद शाम सोनवणे यांना घेऊन सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहाजवळ गेला. तेथे त्याचा एक साथीदार आधीपासून थांबलेला होता. दोघांनी सोनवणे यांना सांगितले की, तुमच्या साहेबांची वैयक्तिक माहिती व कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती माहिती अधिकाराखाली यापुढे मागणार नाही. तसेच कोणतीच बदनामी करणार नाही, या अटीवर रविवारी दुपारी चारच्या सुमारास ८ लाख रुपये घेऊन येथेच आणून द्यायचे, अशी तंबी दिली
त्यावरुन गणेशकर यांनी सिडको पोलीस ठाणे गाठत खंडणीखोरांविरुध्द तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने रविवारी दुपारी पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, जमादार नरसिंग पवार, जमादार राजेश बनकर, पोलीस नाईक प्रकाश डोंगरे व अन्य कर्मचाऱ्यांनी सापळा रचत मुसक्या आवळल्या.
असे अडकले जाळ्यात
लिपीक विनोद सोनवणे यांच्या हातात पोलिसांनी २ हजारांच्या पंधरा नोटा देत ४ बंडल तयार करण्यात आले. या बंडलांच्या मध्यभागी कोरे कागद ठेवण्यात आले. यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास सोनवणे यांना पाहून पालकर, मोरे आणि साळवे असे तिघेही त्यांच्याजवळ आले. सोनवणे यांनी पालकरच्या हातात बंडल देताच नाट्यगृहासमोरील एका हॉटेलच्या बाकड्यावर बसलेल्या पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले.