औरंगाबाद - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पोलिसांकडून नाकाबंदी करत विनामास्क फिरणा-या टवाळखोरांवर कारवाई केली जात आहे. बुधवारी सकाळी अकरा ते साडेबाराच्या सुमारास छावणी पोलिसांनी ट्रिपल सीट व विनामास्क फिरणा-या तब्बल २४ टवाळखोरांना पकडून त्यांच्यावर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला.
छावणीतील मिलिंद चौकात आज सकाळी अकरा वाजेपासून पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली. यावेळी विनामास्क व दुचाकीवर ट्रिपलसीट जाणा-या वाहनधारकांना पोलिसांनी अडवले. त्यांना रस्त्याच्या एका बाजूला बसवून मास्क बांधायला लावत त्यांचे समुपदेशन केले. या नाकाबंदीत पोलिसांनी २४ जणांना पकडून त्यांच्यावर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक मनोज पगारे, उपनिरीक्षक सचिन मिरधे यांच्यासह आठ कर्मचारी उपस्थित होते. तसेच वाहनचालकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच बाहेर पडताना मास्क घालण्यासाठी तंबी देखील देण्यात आली.