औरंगाबाद - मराठवाड्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यात आढळले असून हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. औरंगाबाद शहरातील काही भागांमध्ये लॉकडाऊनचे पालन होत नसल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेने 'माझा वार्ड कोरोनामुक्त' ही चौदा दिवसांची मोहिम शहरात राबवण्यास सोमवारपासून सुरुवात केली आहे.
औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी ही मोहिम सुरू करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. तर, शिवसेना आमदार डॉ. अंबादास दानवे यांनी प्रतिसाद देत शहरातील काही भागांमध्ये स्पीकर लावून नागरिकांना आपला भाग कोरोनामुक्त करण्याची शपथ दिली. सोमवारपासून सुरू झालेल्या या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने आपापल्या घरीच 'मी आणि माझे कुटुंब लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करेन. तसेच पोलीस, प्रशासन व आरोग्य यंत्रणांनी घालून दिलेल्या नियमांचेदेखील पालन करेन. स्वतः घरात राहून इतरांनाही घराबाहेर न पडण्याचे आवाहन करेन. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे लागले तर, मास्क घालूनच बाहेर पडेन. दिवसातून सहा ते दहा वेळा साबणाने हात स्वच्छ धुवेन. समाजाला कोरोनामुक्त करण्यासाठी मी माझ्यासह कुटुंबातील सदस्यांसह शपथ घेत आहे की, एकमेकांपासून सहा फूट अंतर राखीन. मी स्वतः शिस्त पाळून आपला जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन', अशी शपथ घेण्यात आली.
शहरातील प्रत्येक भागात ही शपथ सर्वांनी घ्यावी असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले होते. या आवाहनाला अनेक नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. पालिका आयुक्तांनी स्थानिक खासदार आणि आमदार यांना शपथ घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी खासदार भागवत कराड, इम्तियाज जलील यांच्यासह संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, अतुल सावे, सतीश चव्हाण या आमदारांना शपथ दिली. या मोहिमेअंतर्गत येणारे 14 दिवस महापालिका वेगवेगळ्या उपायोजना करणार आहे. यात नागरिकांनी सकारात्मक राहून कोरोनापासून बचाव करण्यासोबतच आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या इतर नागरिकांना प्रोत्साहित करणे. प्रशासनामार्फत जनजागृती करणे असे विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.