औरंगाबाद - जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेताच ग्रामीण भागात नागरिकांनी मास्क वापराने बंद केले आहे. केंद्र सरकारद्वारे करण्यात आलेल्या एका पाहणी अहवालात हा प्रकार समोर आला आहे.
केंद्र सरकारद्वारे विद्यापीठ आणि स्वायत्त महाविद्यालयांना ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागात कोविड प्रतिबंधासाठी काय उपाय योजना केल्या गेल्या याबाबत सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले होते. मे महिन्यांपूर्वी जी लोक मास्क, सोशल डिस्टन्सचे पालन करत होती, ती लोक 1 जूननंतर मास्क न वापरता व कुठलीही खबरदारी न बाळगता वावरत असल्याचे पहायला मिळाले. सर्वेक्षण करणारे प्राध्यापक डॉ. योगेश साठे यांनी याबाबत माहिती दिली.
गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात ग्रामीण भागामध्ये काय उपाय योजना करण्यात आल्या? नागरिक कशी काळजी घेत आहेत, याबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. योगेश साठे आणि प्रा. सुदाम दिवटे यांनी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार काही गावांचे सर्वेक्षण केले. मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला हे सर्वेक्षण करण्यात आले. मे महिन्यात गावांमध्ये बाहेरील नागरिकांना प्रवेश निशिद्ध करण्यात आला होता. नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करत सोशल डिस्टन्सचे पालन करत होते. त्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली असल्याचे दिसून आले.
मात्र, १ जूननंतर यात मोठा बदल दिसून आला. गावातील नागरिकांनी मास्कचा वापर बंद केल्याचे पहायला मिळाले. याबाबत ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांना विचारले असता, त्यांनी आता सरकारनेच सूट दिली असल्याची उत्तरे दिली. त्यामुळे सरकारने दिलेल्या सूचना नागरिकांना व्यवस्थित समजत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
त्यामुळे नागरिकांना वेळीच सतर्क करून त्यांच्याकडून नियमांचे पालन करून घेतले पाहिजे. तरच आपण कोरोनाचा सामना योग्य पद्धतीने करू शकतो. अन्यथा परिस्थिती बिकट होऊ शकते, अशी भीती सर्वेक्षणकर्ते प्रा. डॉ. योगेश साठे यांनी व्यक्त केली.