औरंगाबाद- जिल्ह्यात दोन दिवसांनी बाजारपेठा काही काळासाठी उघडल्या. त्यामुळे अनेकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगची ऐसीतैशी झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी अनेक ठिकाणी रेड झोन वगळता काही प्रमाणात बाजार उघडण्यास परवानगी दिल्याच्या बातम्या समोर आल्याने आजपासून व्यवहार सुरू होतील या आशेने लोक बाजारात आले होते. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन कायम असणार असल्याचे सांगितल्याने कोणतेच व्यवहार सुरू झाले नाहीत. रस्त्यावर गर्दी मोठया प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले.
राज्यातील ग्रीन, ऑरेंज, रेड झोन मध्ये नियम अटी लावून दारू दुकान उघडण्यास सूट दिल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी तळीरामांनी दारू दुकानासमोर गर्दी केली होती. मात्र, पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी दारू दुकान उघडणार नाहीत अशी भूमिका रात्री उशिरा जाहीर केल्याने सकाळी दारू दुकान घडली नसल्याने तळीरामांचा बिसमोड झाला. त्यांना रिकाम्या हाताने परतावं लागलं.
पोलीस आयुक्तांनी पत्रक जारी करून शहरात लॉकडाऊनमध्ये कुठलाच बदल होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे शहरातील व्यवहार एक दिवसाआड करावेत, सकाळी 6 ते 11 या काळात जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांनी बाहेर पडावे अस आवाहन पोलिसांनी केले. मात्र, रात्री उशिरा निघालेल्या परिपत्रकाची माहिती अनेकांना मिळाली नाही.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात शंभर टक्के लॉकडाऊन असल्याने, तीन दिवसांनी नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले. नागरिकांनी सकाळीच जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला होता. किराणा सामान घेण्यासाठी, भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी कलम 144 लागू आहे का? हा प्रश्न निर्माण झाला होता. एक दिवसाआड दुकान घडणार असल्याने होणारी गर्दी थांबवण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.