औरंगाबाद - जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील पाचोड या गावापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या कानडगाव तालुक्यातील अंबड या गावात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने पैठण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. हे दोन्ही रुग्ण पैठण तालुक्यातील पाचोड येथे येऊन गेल्याने, पाचोडचे सरपंच राजू नाना भुमरे यांनी तातडीची बैठक आयोजित करून अंबड पाचोड रस्ता सील करण्याचा निर्णय घेतला.
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील कानडगाव, हे औरंगाबादच्या पैठण तालुक्याच्या सीमेलगत पाचोडपासून अवघ्या चार किमी अंतरावर आहे. रविवारी कानडगाव या ठिकाणी कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हे दोन्ही व्यक्ती पैठण तालुक्याच्या पाचोड या ठिकाणी येऊन गेल्याचे त्यांच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीमध्ये आढळून आले आहे. त्यामुळे पाचोड गावचे सरपंच राजू नाना भुमरे यांनी तातडीची प्रशासकीय बैठक बोलवून कानडगाव पाचोड सीमा सील करण्याचा निर्णय घेतला. तसेच, या दोन्ही व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी करत त्वरित वैद्यकीय तपासणी करण्याचेही सांगितले आहे.