औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या मेळाव्यात लावलेल्या पोस्टरवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटोच लावायचा आयोजकांना विसर पडला. ही चूक लक्षात येताच त्या नेत्यांचे फोटो वेगळे छापून त्याच पोस्टरवर लावण्यात आले. सर्वांच्या समोर झालेला हा प्रकार आता चांगलाच चर्चेला आला आहे.
शहरात महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थित मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, कार्यक्रमाच्या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्यात आले होते. त्याचवेळी रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे या नेत्यांसह आमदार अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांचे फोटो लावले नसल्याचे मेळावा सुरू होण्याच्या काही वेळ आधी लक्षात आले.
हेही वाचा - 'बापहो...माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ काढून त्यात मोडतोड करून ते व्हायरल करू नका'
त्यामुळे कार्यकर्त्यांनी विसरलेल्या नेत्यांचे फोटो तातडीने छापून आणले आणि त्या पोस्टरवर चिटकवले. ऐन कार्यक्रमाच्या काही वेळ आधी झालेला हा प्रकार कार्यकर्त्यांसह शहरात चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे.