नागपूर/औरंगाबाद - मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त अनेकांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला असला तरी काही ठिकाणी गालबोट लागले आहे. नागपूरमध्ये उच्च दाबाच्या विद्यूत तारेवर अडकलेली पतंग काढताना स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू झाला. तर नायलॉन मांजाचा फास बसून 'करकोचा' नावाच्या पक्षाला आपला जीव गमवावा लागला. तसेच एकाची मान आणि हात कापला गेल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबादेत घडली.
नागपुरात एकाचा मृत्यू -
विजयनगर भागात राहणारा तुलेश जयलाला साहू (वय 24) हा शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या सूमारास गावावरून आला होता. यात 5 वाजताच्या सुमारास घराचा छतावर उभा असतांना त्याला हायटेन्शन लाईनवर पतंग दिसली. हीच पतंग काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा हायटेन्शन लाईनमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच नायलॉन मांजामुळे अनेक मुक्या पक्ष्यांवर संक्रांत आली आहे. नायलॉन मांजामुळे जखमी झालेले सुमारे दहा पक्षी हे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला उपचारासाठी पाठवण्यात आले. शहरातील काही पर्यावरण आणि पक्षी प्रेमींनी दखल घेतल्याने या पक्षांना उपचार मिळाला. डॉ. मयूर काटे व डॉ. सय्यद बिलाल अली, पशुपर्यवेक्षक सिद्धांत मोरे यांनी पक्ष्यांवर उपचार केले. तसेच उपवनसंरक्षक डॉ भारत सिंह हाडा, नागपूर वनविभाग आणि वन्यजीव सलागर मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरू आहे. यात दिवसभरात आलेल्या पक्ष्यांमध्ये बगळा, घुबड, कबूतर, डव, ढोक, घार इत्यादी पक्षी मांजाने जखमी झालेले होते. त्यात एक बगळा मृतावस्थेत ट्रान्झिटला सेंटरला आणण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यामध्ये दुर्मिळ असा ब्लॅक स्टोर्क (Black stork) हा सुद्धा जखमी अवस्थेत मिळून आला. त्यावर उपचार करत ट्रान्झिट सेंटरला जीवनदान देण्यात आले. दरवर्षी विशेष मोहीम राबवत या पक्ष्यांवर उपचार केले जात आहे. कोणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी ट्रान्झिट सेंटरला आणून द्यावे, असे आवाहन ट्रान्झिट सेंटरकडून करण्यात येते.
औरंगाबादेत कारकोचा पक्षाचा मृत्यू -
पतंगीच्या नायलॉन मांजाचा फास बसून 'करकोचा' नावाच्या पक्षाला आपला जीव गमवावा लागला. तर एका नागरिकाची मान आणि हात कापला गेल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. खाम नदी परिसरात 'करकोचा' हा पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला. मांजामुळे मानेवर गंभीर जखम झाली होता. त्याच्यावर सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात उपचार करण्यात आले. मात्र मांजामुळे मान पूर्ण कापली गेल्याने तडफडून त्याचा मृत्यू झाला. मृत करकोचा उद्यानात खड्डा करून पुरण्यात आले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीवर क्रांति चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसीतून काम संपल्यावर घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्याच्या गळ्याला आणि हाताला मांज्यामुळे जखम झाली. प्रवीण खरात असे या कर्मचाऱ्याचे आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांच्यावर मिनी घाटीत उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी मांजामुळे मोठा घात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.