औरंगाबाद - राष्ट्रवादीच्या युवा नेत्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपात सत्यता नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक तपासात काही तांत्रिक बाबी तापसल्यानंतर ही बाब समोर येत असली, तरी हा अंतिम निकष नाही, याचा अधिक तपास करून सत्य समोर आणू, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
मोबाईल लोकेशनवरून प्राथमिक तपास -
महिलेने दिलेल्या माहिती नुसार पोलिसांनी मेहबूब शेख आणि महिलेच्या मोबाईल लोकेशनची तपासणी केली. त्यामध्ये मागील एका वर्षात महिला शिक्षक आणि मेहबूब शेख यांचे संभाषण झालेले नाही. इतकंच नाही तर दोघांचेही मोबाईल एका ठिकाणी आल्याचा पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे मेहबूब शेख यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीत तफावत आढळून येत असल्याची माहिती समोर आली आहे.
सहायक पोलीस आयुक्तांकडे तपास -
मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या आरोपानंतर औरंगाबादसह राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, या घटनेचा तपास आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. शनिवारी तक्रार दाखल केल्यानंतर रविवारपासून घटनेचा तपास सुरू करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक या घटनेचा तपास करत होते. मात्र, तपास योग्य रीतीने व्हावा, यासाठी हा तपास आता सहायक पोलिस आयुक्तांकडे सोपवण्यात आला आहे, लवकरच योग्य दिशेने तपास होईल आणि सत्य बाहेर येईल अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
महिला शिक्षिकेने दिली होती तक्रार -
महिला शिक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार कोचिंग क्लासेससाठी जागा शोधत असताना मेहबूब शेख यांच्याशी तिची ओळख झाली. त्यानंतर काहीवेळा जागा बघण्यासाठी ते भेटले होते. मुंबईला जाऊन नोकरीसाठी आपण प्रयत्न करू शकतो, असे मेहबूब शेखने महिलेला सांगितले. त्यानुसार मुंबईला जाण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात महिला सिडको परिसरात मेहबूब शेखला भेटली. त्यानंतर कारमध्ये बसल्यावर मेहबूब शेख यांनी आपली कार अज्ञातस्थळी उभी करून अत्याचार केला, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. दरम्यान दोघांचेही मोबाईल लोकेशन कधीही एका ठिकाणी आलेले नाहीत किंवा मागील एक वर्षापासून दोन्ही क्रमांकावरून एकमेकांना संपर्क झालेला नाही, असा निकष पोलिसांनी काढला आहे.
हेही वाचा - एकनाथ खडसेंच्या चिंतेत पडली भर; पुन्हा कोरोनाची लागण ?