औरंगाबाद - 28 तारखेला मी माझी भूमिका मांडेन, मात्र गरीब समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका कायम आहे. सगळ्या बहुजनांना न्याय मिळतोय. मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, असं मत छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केले. मराठा समाज फॉरवर्ड क्लास आहे, असे न्यायालय म्हणत आहे. आम्ही गप्प बसावं का? असं सांगत सध्या रस्त्यावर आंदोलन करून लोकांना वेठीस धरणे योग्य नाही. सरकार ऐकत नसेल तर आंदोलन ठीक आहे. मात्र सगळा विषय सध्या न्यायालयात आहे. त्यामुळे सरकारने काय देता येईल ते द्यावं. मात्र आंदोलन करून मार्ग निघणार नाही, असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे.
माझा दौरा कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही -
आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज अस्वस्थ आहे. समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी राज्यभर दौरा करत असल्याची माहिती छत्रपती संभाजी महाराजांनी दिली. माझा दौरा कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही. समाजाचा घटक असल्याने त्यांना समजून घेणे हे माझं कर्तव्य आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शरद पवार या सगळ्यांची भेट घेणार असल्याचे संभाजी महाराज यांनी सांगितले.
हे ही वाचा - हिंगोलीच्या सोनूवर कोणालाच भरवसा नाय, तब्बल १३ नवरदेवांना फसवणारी सोनू अखेर गजाआड
समाजाला राजकीय रंग देऊ नका -
राज्यकर्त्यांनी आता भूमिका मांडण्याची वेळ आहे. समाजाला राजकीय रंग कोणीही देऊ नये. सगळ्यांना त्यांनी समाजासाठी काय काय करता येईल हे राजकारण सोडून केलं पाहिजे, असं मत संभाजी महाराजांनी व्यक्त केले. विनायक मेटे यांचा मोर्चा हे त्याचं मत आहे. मात्र माझी बाजू स्पष्ट आहे. रस्त्यावर उतरणे हे धोकादायक आहे ते मी आधी सांगितले आहे. मराठा आरक्षणासाठी कोणी राजीनामे द्यावे हे सांगू शकत नाही. मात्र माझा राजीनामा देऊन जर प्रश्न सुटत असेल तर मी नक्कीच राजीनामा देईन असे देखील छत्रपती संभाजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आरक्षणापेक्षा सारथी जास्त महत्त्वाचा आहे. मराठा समाजाला दिशा देण्यासाठी सारथी जिवंत राहण्याची गरज आहे. मराठा आरक्षणाबाबत मी प्रकाश आंबेडकर, हरिभाऊ राठोड यांचीही भेट घेणार आहे. आरक्षणाबाबत त्यांची भूमिका समजून घेत त्यावर मार्ग काढण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन, असा विश्वास छत्रपती संभाजी महाराजांनी व्यक्त केला.
हे ही वाचा - उजनीच्या पाण्याचा वाद शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानावर; इंदापूरचे आंदोलक ताब्यात