औरंगाबाद - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी निवडणूक पार पडली. अध्यक्षपदासाठी माजी आमदार नितीन पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालकांनीही हालचाली केल्या होत्या. मात्र, निवडणुकीच्या दिवशी नितीन पाटील सोडता एकही अर्ज न आल्याने अध्यक्ष पदाची माळ नितीन पाटील यांच्या गळ्यात पडली. अध्यक्षपदासाठी सहानुभूती म्हणून माजी आमदार नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, मध्यंतरी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, रामकृष्णबाबा पाटील, आमदार संदिपान भुमरे यांचीही नावे चर्चेत होती. विधानसभा अध्यक्षांनी नकार दिल्याने नकार दिल्यामुळे इतर कोणीही अर्ज भरण्यासाठी पुढे आले नाही. यामुळे नितीन पाटील यांचा मार्ग मोकळा झाला. अध्यक्षच्या निवडणुकीत नितीन पाटील यांच्या नावाने २ अर्ज आले. इतर कुठलाही अर्ज न आल्यामुळे जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी नितीन पाटील यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड घोषित केली.
बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या निधनानंतर ३ महिन्यापासून हे पद रिक्त होते. सुरेश पाटील यांनी सर्वपक्षीय संचालकांना सोबत घेऊन ही बँक तोट्यातून नफ्यात आणली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते. यापुढे बँकेच्या सर्व सदस्यांसाठी हिताचे निर्णय घेणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांनी सांगितले.