औरंगाबाद - कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असताना औरंगाबादमधील एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सहा महिन्यांच्या बाळाचे शीर धडापासून वेगळे करुन फेकल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
सकाळी सहाच्या सुमारास राजबाजार परिसरात कुत्राच्या तोंडात लहान बाळाचे डोके असल्याचे एका सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. हे पाहून त्याने ओरडायला सुरुवात करताच कुत्र्याने तोंडातील शीर टाकून पळ काढला. यानंतर पहाटे बाळाचे शीर कापले गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
महानगरपालिका आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. राजबाजार येथील कवठीच्या वाड्याजवळ पहाटेच्या सुमारास क्रूरपणे ही हत्या केली गेल्याची प्राथमिक माहिती आहे. सिटी चौक पोलिसांनी धडापासून वेगळे करण्यात आलेले हे शीर ताब्यात घेत पंचनामा केला आहे. बाळाचे धड अद्याप सापडले नसल्याने बाळ स्त्री जातीचे होते की पुरुष हे स्पष्ट झाले नाही. याबाबत मनपा कर्मचाऱ्याच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.