औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 20) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा कन्नड येथे संपन्न झाला. या संवाद दौऱ्यात सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांशी शहरातील स्व. पूर्णाकाकू महिला प्रबोधिनी येथे संवाद साधला.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुळे म्हणाल्या की, आज काल मुले, मुली घरातून बाहेर पडल्यावर सुखरूप सुरक्षित घरी परत आली पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. हल्ली अनेक वृत्तपत्र उघडल्यावर महिला अत्याचाराच्या बातम्या मोठ्याप्रमाणावर वाचण्यास मिळतात. ही राज्यासाठी मोठी शरमेची बाब आहे. महाराष्ट्रात मुली महिलांवर बलात्कारासारखे अत्याचार सोडाच साधी छेड ही कोणी काढणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सुळे यांनी केले.
हेही वाचा - भाजप आक्रमक.. वारिस पठाणांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला औरंगाबादमध्ये मारले जोडे
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाशी मागील काही महिन्यांपासून असंख्य कार्यकर्ते जोडले गेले असून या सर्व कार्यकर्त्यांना नवीन उभारी देण्यासाठी पक्ष पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी व महिला सबलीकरण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न करीत असून बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उद्योग उभारावा, आपल्या उत्पादनाची ब्रॅण्डिंग करावी यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल त्यासाठी आम्ही सदैव तयार असल्याचे त्यांनी उपस्थित महिला कार्यकर्त्यांना सांगितले.
हेही वाचा - अनैतिक संबंधात अडसर.! प्रियकराच्या साथीने पत्नीने केली अंध पतीची हत्या
सुळेंनी दुपारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वैयक्तिक चर्चा केली. या संवाद दौऱ्यात तालुक्यातील शेकडो नागरिकांनी सुळे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मंचावर संतोष किसनराव कोल्हे ,जिल्हा अध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील,माजी आमदार भाऊसाहेब पाटील ,अभय पाटील ,माजी आमदार किशोर पाटील,निलेश राऊत , नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, तालुका अद्यक्ष बबनराव बनसोड,शहर अध्यक्ष अहेमद अली भैया,कल्याण पवार,महिला तालुका अध्यक्ष सविताताई मातेरे उपस्थित होते.