औरंगाबाद - राज्य सरकारने येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय उरकून टाकावा. दोन तासांपेक्षा अधिकचा वेळ लागणार नाही. सरकारच्या हातात जे आहे ते त्यांनी करावे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवार औरंगाबादच्या वेरूळ येथे झालेल्या मेळाव्यात केली.
कुठे तह करायचा हे आमच्या रक्तात...
संभाजीराजे औरंगाबाद दौऱ्यावर आले असताना यशवंतराव चव्हाण सभागृहात युवकांचा संवाद मेळावा घेतला. या मेळाव्यात संभाजीराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली. मराठा समाजाने शांततेत काढलेल्या ५८ मोर्च्याच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. असे असताना परत आम्हाला का आणि कशासाठी वेठीस धरता, पुन्हा पुन्हा कशाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडता, जनतेचे सेवक आहात तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे का येत नाहीत, असा सवाल संभाजीराजे छत्रपतीराजे यांनी राज्यकर्त्यांना केला. सध्या शांत आहोत, याचा अर्थ गप्प बसलो असा नाही. कुठे तह करायचा, हे आमच्या रक्तात आहे, असे खडेबोलही त्यांनी सुनावले.
प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घ्या -
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणे ही लोकप्रतिनिधिंची जबाबदारी आहे. मात्र ते समाजाला दिशा देत नसून दिशाहीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. जातिजातीत तेढ वाढत आहेत. ते कमी करण्यासाठी आलो आहे, असे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले. आम्ही जनतेच्या करातून पगार पगार घेतो. मग आम्ही प्रश्न सोडविण्याची जबाबदारी का घेत नाही. सत्तेत असणारे आणि नसणारे अशा सर्वांनी एकत्र येवून मराठा समाजाचे प्रश्न सोडवावे, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले. आरक्षण नाकारताना ३० टक्के राजकारणी कसे श्रीमंत आहेत, हे सांगितले गेले. पण त्यामुळे ७० टक्के गरीब मराठ्यांचे नुकसान होत आहे. याबद्दल कुणी बोलत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मंचावर रमेश केरे पाटील, अप्पासाहेब कुढेकर, राहुल पाटील, किरण काळे यांच्यासह समन्वयक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.