औरंगाबाद - एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असौउद्दीन ओवैसी यांनी स्वतः गाडी चालवत औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांना संसदेत नेले. याबाबतचा फोटो इम्तियाज जलील यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. प्रथमच खासदार झालेल्या जलील यांनी आपल्यासाठी हा अनुभव अविस्मरणीय आणि आनंददायी असल्याचे म्हटले आहे.

दिल्लीत असौउद्दीन यांची भेट घेतल्यावर त्यांनी शुभेच्छा दिल्या इतकेच नाही तर 'बैठो मैं गाडी चलाउंगा' असे म्हणत स्वतः गाडी चालवत संसदेत नेले. पहिल्याच दिवशी असौउद्दीन यांनी संसदेचे कामकाज कसे चालते हे जलील यांना सांगितले. तसेच त्यांनी प्रमुख लोकांच्या ओळखी देखील करून दिल्या. त्याबरोबरच त्यांनी दिल्ली देखील फिरवून दाखवली, असा अनुभव इम्तियाज जलील यांनी सांगितला.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून इम्तियाज जलील यांनी सर्वांनाच मोठा धक्का दिला. पत्रकार असलेल्या जलील यांनी पहिल्याच प्रयत्नात विधानसभा आणि नंतर लोकसभा जिंकली. त्यांच्या विजयाने राज्यातील अनेकांना मोठा धक्का बसला. खासदार झाल्यावर इम्तियाज जलील यांनी प्रथमच दिल्लीत प्रवेश केला. दिल्लीत जाणे काही नवीन नसले तरी खासदार म्हणून जाण्याचा आनंद वेगळा होता.
पाहिल्या दिवशी ओळखपत्र तयार करण्यासाठी लागणारी प्रक्रिया पार पडली, त्यानंतर संसदेचे काम समजून सांगत काही ओळखी करून दिल्या. नंतर दिल्लीतील खानगल्ली देखील फिरवून दाखवली. खासदार म्हणून दिल्लीतला पहिला दिवस अविस्मरणीय आणि आनंदायी असल्याचे मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले. त्यांनी असोउद्दीन ओवैसी यांच्यासोबतचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.