औरंगाबाद - राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी मुस्लिम आरक्षणावर बोलावे. नुसते डोक्यावर टोपी घालून तोंडात खजूर घेऊन राजकारण करण्यासाठी फोटो काढू नका, अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी लढावं -
राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी मुस्लिम आरक्षणावर आवाज उठवला पाहिजे. मराठा समाज असो की ओबीसी समाज त्या-त्या समाजाचे नेते त्यांच्या मागण्यासाठी, समाजचे मागासपण दूर करण्यासाठी आवाज उठवत आहेत. मंंत्री नवाब मलिक, आरेफ नसीम, अस्लम शेख आणि इतर मुस्लिम नेते शांत का? तुम्ही तोंडात लाडू घेऊन गप्प का? अशी टीका खासदार जलील यांनी उपस्थित केला.
शरद पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांवर टीका -
राज्यातील मुस्लिम नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी मुस्लिम आरक्षणावर बोलले पाहिजे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुसलमानांना आरक्षण मिळावे म्हणून आताचे सत्ताधारी मागणी करत होते. मात्र, आता सत्तेत आल्यावर हे नेते का बोलत नाहीत? शरद पवार यांचे डोक्यावर टोपी घालून, तोंडात खजूर घेऊन काढलेले फोटो रमजानसाठीच आहेत का? असा सवालही त्यांनी केला. तसेच आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील मुसलमानांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुसलमानांवर राजकारण केले जाते. या नेत्यांनीही मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा काढावा, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
हेही वाचा - ..तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल; ओबीसींच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड नाही - भानुदास माळी
मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी निवेदन -
मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना विविध निवेदन देण्यात आले. मुस्लिम आरक्षण कृती समिती व महाराष्ट्र जनजागरण समितीच्या वतीने विभागीय आयुक्त यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. रोजगार, उच्च शिक्षण मिळत नसल्याने मुस्लिम समाज मागे राहिला आहे. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे कृती समितीने केली आहे. मौलाना आजाद महामंडळाद्वारे देण्यात येणारे कर्ज 25 लाखापर्यंत करावे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.