औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत चालला आहे. रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी खाटा उपलब्ध होत नसल्याने एकाच खाटेवर दोन ते तीन जणांना उपचार द्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे आता उपचार घ्यावे कुठे हा प्रश्न रुग्णांना पडला आहे.
रुग्णालय झाले 'हाऊसफुल्ल'
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजारांच्या घरात गेली आहे. रोज सोळाशे ते सतराशे नवे रुग्ण दाखल होत असल्याने रुग्णालयात खाटा शोधण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वी घाटी आणि खासगी रुग्णालयात एकाच खाटावर दोन ते तीन रुग्ण उपचार घेत असल्याच निदर्शनास आले. तसे काही छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे रोजच आढळून येत असलेल्या नवीन रुग्णांना आरोग्यसेवा तोकडी पडत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकूण रुग्णसंख्या 75 हजारांवर
जिल्ह्याचा कोरोना रुग्णदर 25 टक्क्यांच्यावर गेला आहे. शंभर जणांमागे 25 ते 30 रुग्ण बाधित आढळून येत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात रोज कोरोना रुग्णसंख्या उच्चांक गाठत आहे. आजपर्यंत एकूण रुग्णसंख्या 75 हजार 635 इतकी झाली असून त्यापैकी 59 हजार 168 रुग्ण उपचार घेऊन परत गेले आहेत. 1 हजार 531 रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. तरीही आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना दिल्या असून औषधी पुरवठा विभागाला पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
हेही वाचा - सनदी अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर पाच वर्षांनी राजकीय प्रवेश द्यावा; इम्तियाज जलील यांची मागणी