औरंगाबाद - वरुणराजाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत शेतकरी चातकाप्रमाणे आकाशाकडे डोळे लावून बसले होते. पावसाच्या आगमनाने सध्या शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाल्याने बळीराजा आता पेरता झाला आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले आहे. रानोरानी शेतकरी वर्ग पेरणीच्या कामामध्ये मग्न असल्याचे चित्र ग्रामीण भागात बघायला मिळत आहे. खरीप हंगाम सुरू होऊन 14 दिवस झाले तरीही मान्सून जिल्ह्यात दाखल झाला नव्हता. बऱ्याच गावांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या भरोशावर जिल्ह्यात 20 ते 30 टक्के शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली होती. आता ही पेरणी वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी झळा असून पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले. गेल्यावर्षी शेतकऱ्याच्या शेतामध्ये काहीच पिकलं नाही. विहिरीत पाणी नव्हते, जनावरांना चारा नव्हता अशा बिकट अवस्थेत शेतकऱ्यांनी दिवस काढले. सध्या पावसाला सुरुवात झाली असून शेतकरी वर्ग मका. कापूस आणि सोयाबीनची लागवड करताना दिसून येत आहे.
औरंगाबाद शहरापासून जवळच असलेल्या बनशेंद्रा याठिकाणी पाहिजे असा पाऊस झाला नाही. तरी देखील शेतकऱ्यांनी काही तरी मिळेल या आशेपोटी नेहमीप्रमाणे पेरणीला सुरुवात केली आहे. पेरणीसाठी पैसे नसल्याने उसनवारी करून बी बियाणे विकत घेतले, शेतात खत घेतले. जनावरांना मात्र चारा नसल्याने उपाशीपोटी ते शेतात पेरणी करीत असल्याची हकीगत शेतकरी पिराजी कचकुरे यांनी मांडली. जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी पाऊस झाल्याने शेतकरी तर आनंदित झाला आहे. आई देखील लेकराचा झोका झाडाला टांगून पेरणीला मग्न झाली असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.