औरंगाबाद - राज्यात वीज बिल भरण्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. औरंगाबादेत महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारत असताना मनसेच्या जिल्हाध्यक्षकांनी वीज बिल फाडून अधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावली. ही सुरुवात असून यापेक्षा तीव्र भूमिका भविष्यात मनसे घेईल, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी दिला.
लॉकडाऊनच्या काळातील अनेक नागरिकांना अव्वाच्या-सव्वा बिले महावितरणने दिली आहेत. वाढीव बिलाबाबत तक्रार देण्यासाठी महावितरणने कुठलेही केंद्र अद्याप सुरू केलेले नाही. अनेक नागरिकांना आपली विजेची बिले भरण्याची इच्छा आहे, त्याआधी त्यात असलेल्या चुका दुरुस्त करायला हव्यात. मात्र, असलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी महावितरणने कुठलीही यंत्रणा उभी केलेली नाही. प्रत्येक गावांमध्ये आणि शहरातील प्रत्येक वार्डात एक दिवस एक अधिकारी ही योजना चालू केल्याची महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात अशी कुठलीच यंत्रणा कार्यान्वित नव्हती. त्यामुळे नागरिकांना बिलाबाबत आपल्या तक्रारी नोंदविता आलेल्या नाहीत. परिणामी आलेली बिले भरण्याचा तगादा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे. त्यामुळेच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या सर्व तक्रारींचा निपटारा लवकरात लवकर करावा अन्यथा मनसे काय करू शकते हे माहीत आहे, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी दिला.
नागरिकांना वीज बिल भरण्यासाठी सक्ती करू नये
मनसेने वाढीव वीजबिलांविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 28 तारखेपासून हे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांच्या असलेल्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवल्या आहेत का? त्या बाबत नेमकी भूमिका काय आहे? वाढीव बिल कमी करणार आहात का? नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी काय सुविधा आहेत? या प्रश्नांची उत्तरे वीज वितरण विभागाने द्यावी आणि नागरिकांना वीज बिल भरण्यासाठी सक्ती करू नये, अन्यथा मनसे तुम्हाला धडा शिकवेल, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी दिला.
हेही वाचा - 'मागे झालेलं लक्षात ठेवण्यासारखं नाही, यापुढे योग्य वेळी शपथ घेईल'
हेही वाचा - औरंगाबादमध्ये सायकल खरेदीसाठी 8 दिवसांची प्रतीक्षा यादी, कोरोनाचा प्रभाव