औरंगाबाद: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधी बाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्या शपथविधीबाबत संजय राऊत आणि शरद पवार यांना कल्पना होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीला अडचणीचे झाले असते.
संजय राऊतांवर गंभीर आरोप: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊतांवर मोठा आरोप केला आहे. सकाळचा शपथविधीबाबत संजय राऊत यांना माहित होते. या संपूर्ण घटनाक्रमाला संजय राऊतच जबाबदार आहेत. आम्हाला गद्दार म्हणणारे संजय राऊत हे स्वतःच गद्दार आहेत. आज जी पक्षाची अवस्ठा झाली आहे ती एकट्या संजय राऊतांमुळेच झाली आहे, असे गंभीर आरोप त्यांनी आज औरंगाबादेत केले आहेत.
इच्छा नसतानाही व्हावे लागले मुख्यमंत्री: राष्ट्रवादी कॉंग्रेसने नियोजन करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची अट ठेवली. याप्रमाणे नाही झाले तर आम्ही भाजपसोबत जाऊ हे दाखवून दिले. त्यामुळे इच्छा नसताना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हावे लागले. असे विधान आमदार शिरसाट यांनी केले. तसेच सकाळच्या शपथविधी घेण्यापूर्वी शरद पवारांसोबत चर्चा केली होती. हे अजित पवारांनी शांत राहून स्पष्ट केले आहे. कारण अजित पवार हे स्पष्ट बोलणारे नेते आहेत.
उपमुख्यमंत्री फडणवीसांचा गौप्यस्फोट : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीवरून गेल्या दोन दिवसांपूर्वी मोठा गौप्यस्फोट केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार या वादातून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती फिसकटली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेऊन पहाटेचा शपथविधी केला होता. मात्र अवघ्या अडीच दिवस हे सरकार सत्तेत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढल्यामुळे हे सरकार पडले होते. मात्र, अजित पवार यांच्यासोबत केलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
काय म्हणाले होते पवार?: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, मला वाटले की देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारची वक्तव्य करतील, असे मला कधीही वाटले नाही. असे वक्तव्य करत त्यांनी फडणवीसांचा दावा फेटाळला होता.
हेही वाचा : Devendra Fadnavis Revealed: मोठी बातमी! पहाटेचा शपथविधी शरद पवारांना विचारूनच; फडणवीसांचा गौप्यस्फोट