छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : सध्या राज्यात अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली जोर धरून आहेत. त्यामुळे अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. मात्र पुढचे राजकीय गणित काय असेल ते माहीत नाही, सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राहतील, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. काँग्रेसमधील आमदार सोबत येण्याच्या चर्चेवर आम्ही कोणाचे घर फोडत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
विद्युतीकरण लवकरच होईल पूर्ण : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, की औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्टेशनपर्यंत रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिकीफिकेशन पूर्ण झाले असून त्याची चाचणी केली जाईल. सर्वात आधी जालना, औरंगाबाद मार्गे मुंबई जनशताब्दी विजेवर धावेल. त्यानंतर इतर रेल्वे देखील धावणार आहे. वंदे मातरम् गाडी विजेवरच चालते, त्यामुळे ती गाडी देखील लवकरच आठवड्यातून एक दिवस या मार्गावर धावेल. आता असलेली गाडी लवकरच स्लीपर करण्याचा विचार असून ते काम देखील होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
२०४७ च्या स्वप्नपुर्तीसाठी योगदान द्यावे : देशात शनिवारी एकाच वेळी ४४ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या ४४ ठिकाणांपैकी छत्रपती संभाजीनगरातील आयसीएआय भवन येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत २५ उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती पत्र देण्यात आले. छत्रपती संभाजीनगरात एकुण १२५ उमेदवारांची नियुक्ती या रोजगार मेळाव्यानिमित्त करण्यात आली. केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तसेच या उपक्रमाला पाठिंबा देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये भरती करण्यात येत आहे. देशभरातून निवडलेले नवीन भरती, आयकर निरीक्षक, पोस्ट निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी, प्रोबेशनरी ऑफिसर, बँकांमधील सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी अशा विविध पदांवर हे उमेदवार रुजू होणार आहेत.
शिक्षित व योग्य उमेदवारांना संधी : पुढे दानवे म्हणाले, की पुर्वीच्या काळात सरकारी नोकरी ही वशिलेबाजीने लागायची. मात्र, मोदी सरकारच्या काळात पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया होत आहे. सर्वसामान्य वर्गातील शिक्षित व योग्य उमेदवारांना संधी मिळत आहे, असे त्यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. या अमृत काळात आपल्या नियुक्त्या विविध सरकारी सेवेत होत आहे. २०४७ साली भारत शतकीय स्वातंत्र्य महोत्सव साजरा करणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी २०४७ साली भारत देशासाठी जे स्वप्न बघितले आहे, त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आज नियुक्त झालेल्या उमेदवारांनी आपले योगदान द्यावे. सर्वसामान्य जनतेची सेवा करावी, असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी याप्रसंगी केले.
हेही वाचा :
- Maharashtra Politics : भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे झळकले बॅनर; शिंदे-पवार गटात तु तू मै मै
- Naveen Patnaik : नवीन पटनायक यांचा नवा रेकॉर्ड, बनले सर्वाधिक काळ पदावर राहणारे दुसरे मुख्यमंत्री
- Shambhuraj Desai : डोंगर भागातील नागरिकांना तात्काळ स्थलांतरित करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आदेश