औरंगाबाद : भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले. सरकारवर अवलंबून राहू नका, देशामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शाळा सुरू केल्या. त्यावेळेस त्यांना सरकारने अनुदान दिले नव्हते; त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या आहे, असं वादग्रस्त विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील संत एकनाथ महाराज संतपीठाच्या अभ्यासक्रम प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात केले. त्यामुळे आता शिक्षण संस्था चालकांनी भीक मागावी का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
संतपीठाच्या पायाभूत सुविधासह इतर उपक्रमासाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाणार असून; डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने, संतपीठासाठी सामाजिक दायित्व निधी (CSR) च्या माध्यमातून देखील निधी उभा करण्याची सुचना पाटील यांनी केली. 12 व्या शतकानंतर भारत देशावर परकीय आक्रमणामुळे समाज विखुरला गेला होता, असे असताना संताच्या शिकवणीतून भारताला स्थिरत्व, आत्मविश्वास आणि संस्कारी जीवन पद्धती मिळाली. यातून मानवेतेचा वैश्वीक संदेश दिला गेला. तो वारसा संतपीठ पुढे नेईल. खऱ्या जीवनाचे सार समाधानी जीवन आहे. संत साहित्यातून समाजासमोर आणखी व्यापक स्वरुपात ते येईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री भुमरे यांनी संतपीठाच्या वसतीगृह व इतर इमारतीची दुरुस्ती व इतर सुविधासाठी दोन कोटी रुपयापर्यंतचा निधी जिल्हा नियोजन समिती मधून देणार असल्याचे सांगितले. तसेच इतर अभ्यासक्रम व अनुषांगिक कामासाठी शासनाकडे पाठवलेला निधीच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी, यासाठी पालकमंत्री या नात्याने पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. शैलेद्रं देवळाणकर, प्र-कुलगुरु डॉ.श्याम शिरसाट यांच्यासह संतपीठात विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसेच प्राध्यापक यांची उपस्थिती होती.