औरंगाबाद - सोशल मीडियावर अब्दुल सत्तार यांच्या नावाने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात अब्दुल सत्तार एका तरुणाला शिवीगाळ करत धमकी देत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच सिल्लोड तालुक्यातील टाकळी जीवरग येथील हा व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सत्तार यांना विचारले असता मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
या व्हायरल व्हिडिओत अब्दुल सत्तार स्पष्टपणे दिसत नाहीत. मात्र, त्यांचा आवाज त्यामध्ये येत आहे. या व्हिडिओत सत्तार त्यांच्या पदाला न शोभणाऱ्या भाषेत शिवीगाळ करत असल्याचे स्पष्ट ऐकायला येते. मराठा आरक्षणाबाबत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचारणा केल्याने आपल्याला शिवीगाळ झाल्याचा आरोप युवकाने केला.
याबाबत राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे विचारणा केली असता. हा आरोप चुकीचा असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. मला बदनाम करण्यासाठी यापूर्वीही असे प्रकार झाले असल्याचे यांच्यावतीने सांगण्यात आले. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार सत्तार त्या गावात गेले असताना एका मंदिरात भाषण करत असताना केलेल्या वक्तव्यावरून वाद झाला आणि त्यामधून निर्माण झालेल्या वादातून ही घटना झाल्याचं गावातील काही नागरिकांनी सांगितले.
हेही वाचा - औरंगाबादमधील नगरसेवकाने तयार केले 'हे' अॅप; तक्रार निवारणात होणार मदत