औरंगाबाद - शहरात आज काही युवक सायकलवर प्रवास करताना दिसले. हे सर्व पुण्यातील आळंदी येथे मोलमजुरी करणारे लोक असून घरी जाण्याच्या परवानगीसाठी अडचण येत असल्याने दोन दिवसांपूर्वी हे सर्वजण सायकलवर निघाले आहेत. सायकलवर आता त्यांना थेट उत्तर प्रदेश गाठायचे आहे.
मात्र, पोलिसांकडे परवानगी मागण्यासाठी गेल्यास त्यांनी दिली नाही. सारपंचकडे सही मागितली त्यांनीही सही दिली नाही. त्यामुळे राहावे कसे असा प्रश्न निर्माण झाल्याने सायकलीवरच घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि घर रिकामे करुन दोन दिवसांपूर्वी पुणे सोडले असल्याचे मजुरांनी सांगितले. तर सरकार काही उपाय योजना करत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात आम्हाला त्याचा लाभ मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
जवळपास 15 जणांनी हजार किलोमीटर पेक्षा अधिकचा हा प्रवास सायकलवर सुरू केला आहे. जायला किती दिवस लागतात माहीत नाही. मात्र, आता घर गाठायचे, असा निर्धार या मजुरांनी केल्याचे काही मजुरांनी सांगितले. अशा मजुरांना सरकार दिलासा कधी आणि कसा देणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - औरंगाबादेत 95 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू, बळींची संख्या 12 वर