औरंगाबाद - मराठा आरक्षणा संदर्भातील बैठक समाधानकारक झाली आहे. पुन्हा पुढच्या आठवड्यात मराठा आरक्षणासाठी बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण आणि मला ही मुख्यमंत्री काही मुद्दे सांगितले आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. औरंगाबाद विमानतळावर आज (शुक्रवारी) त्यांनी संवाद साधला.
कोणी कोणाला भेटले तरी सरकार स्थिर -
राज्यात राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या भेटीवर अनेक चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना राज्यात कोणी कोणा बरोबर चर्चा करत असले तरी सरकार व्यवस्थित चालू आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. हे लोकशाहीचे लक्षण आहे. सध्या कुठल्याही निवडणुका नसल्यामुळे यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. सध्या कोरोनाचे सावट आहे. पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांना खत, बियाणे कसे मिळतील? यावर सरकरचे लक्ष आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - 'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी अलमट्टीप्रकरणी चर्चा करणार' - जयंत पाटील
संजय राऊत यांच्या विधानावर -
मुंबईमध्ये भाजप-शिवसेनेत झालेल्या प्रकरणाबाबत बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी 'शिवसेना ही सर्टिफिईड गुंडा पार्टी' असल्याचे वक्तव्य केले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, कोणी काहीही बोलते. कुठलाही पक्ष स्वतः गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन काम करत आहेत, अशी सावध प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.